Mumbai Crime : जिना चढताना थेट समोर आला अन हात… रेल्वे स्टेशनवर महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक !
रेल्वे स्टेशनवर महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मुंबई | 6 सप्टेंबर 2023 : मुंबईतील गुन्हेगारीचं प्रमाण (crime news) दिवसेंदिवस वाढतच चाललं. लोकल प्रवासही आता फारसा सुरक्षित राहिलेला नसल्याचे गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांवरून दिसून येत आहे. असाच एक प्रकार रेल्वे स्टेशनवर घडल्याचे समोर आले आहे. मुंबईतील मध्य रेल्वेच्या विद्याविहार स्टेशनवर असाच काहीसा प्रकार घडला. तेथे एका महिलेचा विनयभंग (molestation) झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करून विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४ सप्टेंबर रोजी ही घटना घडली असून आरोपीविरोधात कलम 354 व कलम 509 अंतर्गत कुर्ला रेल्वे पोलिस स्थानकांत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इरफान सिद्दीकी (वय 39) असे आरोपीचे नाव असून तो मुंब्रा येथील रहिवासी असल्याचे समजते.
त्या रात्री नेमकं काय घडलं ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 सप्टेंबर रोजी रात्री 9.30 च्या सुमारास एक महिला वकील घाटकोपर येथून ट्रेनने विद्याविहार येथे आली. ती ब्रीजचा जिना चढत असताना, आरोपी जिना उतरू खाली येत होता. तो अचानक पीडित महिलेच्या समोर येऊन उभा राहिला आणि तिच्याकडे अश्लील नजरेने पाहत त्याने तिचा थेट हातच धरला. ती महिला एक क्षण भांबावली पण दुसऱ्याच क्षणी तिने आरडाओरडा सुरू केला आणि स्टेशनवर गस्त घालणाऱ्या पोलिसांना मदतीसाठी हाक मारली. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला पकडले.
त्यानंतर पीडित महिलेने कुर्ला रेल्वे पोलिस ठाण्यात जाऊन आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. ” गुन्हे टाळण्यासाठी प्रत्येक प्लॅटफॉर्मवर पोलिस उपस्थित असतात. विशेषत: महिलांच्या डब्याजवळ, होमगार्ड किंवा GRP कर्मचारी गस्त घालत असतात. त्यांना अधिकाऱ्यांतर्फे सतत मार्गदर्श केले जाते. या घटनेत पीडित महिलेचा आवाज ऐकून पोलिसांचे लक्ष वेधले गेले, त्यांनी तातडीने आरोपीचा पाठलाग करत त्याला रंगेहाथ अटक केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.