युट्यूबवर व्हिडीओ पाहून चोरी, कुणालाही सूचली नसेल अशी ट्रिक वापरली, अखेर…
शहरातील 1 -2 नव्हे तर तब्बल 18 महागड्या बाईक्स चोरीला गेल्याचा प्रकार समोर आल्याने पोलीस हैराण झाले. अथक प्रयत्नांती चोरट्याचा शोधही पोलिसांनी लावला मात्र त्याचा कबुलीजबाब ऐकताच पोलिसही हैराण झाले. त्यांनी अक्षरश: डोक्याला हातच लावला.
राज्यभरात सध्या गुन्ह्यांची प्रकरणं सध्या मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. कुठे चरोी, दरोडा, घरफोडी तर कुठे आणखी काही… या वाढत्या गुन्ह्यांमुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिक मात्र बरेच त्रस्त झाले असून ते जीव मुठीत धरून जगताना दिसतात. त्यातच टेक्नॉलॉजीमुळे गुन्हेगार, चोरही खूप चलाख बनले असून गुन्ह्यांच्या नवनव्या पद्धती शोधून काढताना दिसतात. असाच काहीसा प्रकार पिंपरी-चिंचडवडमध्येही निदर्शनास आला. शहरातील 1 -2 नव्हे तर तब्बल 18 महागड्या बाईक्स चोरीला गेल्याचा प्रकार समोर आल्याने पोलीस हैराण झाले. अथक प्रयत्नांती चोरट्याचा शोधही पोलिसांनी लावला मात्र त्याचा कबुलीजबाब ऐकताच पोलिसही हैराण झाले. त्यांनी अक्षरश: डोक्याला हातच लावला.
यूट्यूबवर व्हिडीओ पाहून शिकला चोरी
या चोरी प्रकरणात पोलिसांनी अभिषेक हावळेकर या चोराला आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराला बेड्या ठोकल्या. त्यांनी शहरातील महागड्या अशा तब्बल 18 बाईक्स चोरल्या. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांनी यू-ट्यूबवर बाईक चोरण्याचे व्हिडीओ पाहून चोरीचे धडे घेतले आणि त्यानंतर या सर्व बाईक्स लंपास केल्या.पोलिसांनी त्याच्याकडून 18 महागड्या बाईक्स जप्त केल्या असून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील जवळपास 16 दुचाकी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
घरच्यांशी भांडून बाहेर पडला अन् चोर बनला…
मिळालेल्या माहितीनुसार, अतिशय चलाख असा हा चोरटा, अभिषेक हावळेकर हा मूळचा सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याचे काही कारणावरून घरच्यांशी भांडण झालं आणि तो बाहेर पडला. त्यानंतर तो खेड तालुक्यातील चाकण येथे राहण्यासाठी आला होता. मात्र येथे आल्यानंतर त्याची पावलं चोरीकडे वळली. त्याने युट्यूब वर चक्क दुचाकी/ बाईक्स चोरण्याचे व्हिडीओ पाहिले. आणि त्यातून धडे घेत तो चोरीच्या उद्योगाला लागला. त्याने त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने शहरातील जवळपास 18 महागड्या बाईक्स चोरी केल्या आहेत. महामार्गालगत सीसीटीव्ही कॅमेरे कमी असल्याने अभिषेक आणि त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराने तेथूनच दुचाकी वाहनांची चोरी केली.
बाईक्स चोरी झाल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्यानंतर पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा चार पोलीस पथकाने कसून तपास केला. त्यांनी जवळपास 80 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे तांत्रिक विश्लेषण करून चोरांचा छडा लावला. आणि अभिषेक मल्लाप्पा हावळेकर आणि त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत. अटक केल्यावर पोलिसांनी अभिषेककडून 18 महागड्या बाईक्स जप्त केल्या असून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील जवळपास 16 दुचाकी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.