घर जावई होत नसल्याने तरुणाला शॉक दिले; त्यानंतर असं काही घडलं… वेंगुर्ल्यातील धक्कादायक प्रकाराने खळबळ
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. केवळ घर जावई होत नसल्याचा राग धरून पत्नी, सासू आणि सासऱ्याने त्या तरुणाचा कायमचा काटा काढला. या तरुणाला फसवून बोलावून त्याला शॉक देऊन जीवे मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे अख्ख्या वेंगुर्ल्यात खळबळ उडाली आहे.
सिंधुदुर्गातील वेंगुर्ल्यात अत्यंत धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. एक तरुण घर जावई होत नसल्याने त्याचा खून करण्यात आला आहे. या तरुणाला विजेचा शॉक देऊन मारण्यात आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. मात्र, या प्रकाराची वेंगुर्ल्यात जोरदार चर्चा होत आहे.
वेंगुर्ल्यात ‘घर जावई’ होत नसल्याने तरुणाचा खून करण्यात आला आहे. नवरा सासूरवाडीला राहायला येत नाही, याचा राग धरून त्याला बोलावून घेत पत्नीसह सासू-सासऱ्याने त्याला विजेचे शॉक देऊन त्याचा जीव घेतला आहे. आडेली-पेडणेकरवाडीतील या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. कुडाळ तालुक्यातील माणगाव-तळीवाडी येथील वसंत उर्फ सागर प्रभाकर भगे (32) असे या घटनेत जीव गमावलेल्या तरुणाचे नाव आहे.
तिघांनाही अटक
मृत तरुणाचा भाऊ संगम प्रभाकर भगे यांनी वेंगुर्ले पोलिसात तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार भारतीय न्याय संहिता 2023 कलम 103 (1), 3 (5) अन्वये वसंत भगे याची पत्नी नूतन शंकर गावडे, तिचे वडील शंकर सखाराम गावडे आणि तिची आई पार्वती शंकर गावडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिन्ही संशयितांना वेंगुर्ले पोलिसांनी अटक केली आहे. आपला भाऊ घरजावई व्हायला तयार नव्हता. त्यामुळेच त्याला रितसर प्लॅन करून ठार करण्यात आले, असे संगम यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
अशी घडली घटना
वसंत ऊर्फ सागर हा माणगाव तळेवाडी येथे राहतो. त्याची पत्नी नूतन ही घरात वाद झाल्याने माहेरी निघून गेली होती. त्यानंतर नूतनने 12 ऑगस्ट रोजी वसंतला आपल्या घरी बोलावलं. वसंतही तिला भेटायला जाण्यासाठी तयार झाला. पण आपल्यासाठी सासूरवाडीत काळ येऊन बसल्याचं त्याच्या ध्यानीमनीही नव्हतं. या घटनेतील तिन्ही आरोपींनी घराच्या भोवतीच्या कंपाऊंडमध्ये विद्यूत तारांचे जाळे तयार करून ठेवले होते. वसंतचा या तारांशी स्पर्श झाला आणि शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. आधी वसंतचा शॉक लागून मृत्यू झाल्याची आवई उठवण्यात आली होती. पण वसंतच्या भावाने ही हत्या असल्याचा आरोप केला असून गावडे कुटुंबीयांविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.