अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानातच मुंबई आता पुन्हा गोळीबाराने हादरली आहे. कल्याण शहरात गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. जेलमध्ये गेलेल्या मित्राच्या पत्नीसोबत तिचा मुलगा भांडतो म्हणून एक इसमाने त्याच्या मित्राच्या मुलाचे अपहरण करून त्याच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे. या प्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरु केला आहे
नेमकं काय घडलं ?
कल्याण मधील बापगाव परिसरात आपल्या आई आणि दोन बहिणीसह राहणारा राहुल गंगे याचे वडील एक गुन्हेगार आहेत. अशाच एका गुन्ह्यात ते कारागृहात शिक्षा भोगत आहेत. मात्र वडील जेलमध्ये गेल्यावर मुलाने घराची जबाबदारी उचलण्याऐवजी त्यांचा मुलगा राहुल हा घरात कायम आईला, पत्नीला मारहाण करत असे. रविवारी सकाळीसुद्धा राहुल याने आईला मारहाण केली. ही माहिती त्यांच्यासोबत राहणाऱ्या राहुलच्या वडिलांच्या मित्राला समजली. मग काय मित्राच्या पत्नीला त्याच्या मुलाकडून त्रास होत असल्याचा राग मनात ठेवत, त्या मित्राने आईला मारहाण करणाऱ्या मुलाचे अपहरण केले. आणि त्याला थेट मुरबाड येथील जंगलात नेले, तिथून कल्याण पूर्वेकडील होम बाबा टेकडी परिसरातील निर्जनस्थळी नेत त्याच्यावर त्याच्यावर गावठी पिस्तुलाने गोळीबार केला. मात्र त्या पिस्तूलमधून गोळी न निघता केवळ छर्र निघाले. हे छर्रे कंबरेत लागल्याने फिर्यादी राहुल गंभीर जखमी झाला आणि कसाबसा जीव वाचवून पळाला. उपचारांसाठी तो कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल झाला. या घटनेची माहिती पेट्रोलिंगच्या पोलिसांना मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत उपचार घेत असलेल्या राहुलची तक्रार नोंदवून घेतली असून आरोपीचा शोध सुरू केला आहे.