आधी पत्नीला दारू पाजली, नंतर तिचा गळाच आवळला.. बचावासाठी अशी कहाणी रचली की !
केरळच्या कोच्चिमधून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका इसमाने त्याच्या पत्नीला जबरदस्ती दारू पाजली आणि नंतर शालीने तिचा गळा आवळला. मात्र त्याने असं का केलं..
तिरूअनंतपुरम | 29 डिसेंबर 2023 : केरळच्या कोच्चिमधून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. तेथे एक इसम घाईघाईत त्याच्या बायकोला हॉस्पिटलमध्ये घेऊन आला आणि ती पडल्याचे त्याने डॉक्टरांना सांगितलं. मात्र तपासल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. तिच्या अकस्मात मृत्यूमुळे पतीला मोठा धक्का बसला आणि तो विलाप करू लागला. मात्र त्यानंतर जे सत्य समोर आलं, त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला.
त्या महिलेच्या पतीनेच तिची हत्या केल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ माजली. या घटनेमुळे आजूबाजूच्या लोकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
असा उघड झाला गुन्हा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ डिसेंबर रोजी शैरी नावाच्या महिलेला तिचा पती शैजू हा एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये घेऊन आला.ती पडल्याचे त्याने डॉक्टरांना सांगितले. मात्र तिची तपासणी केल्यावर डॉक्टरांना तिच्या पतीवर संशय आला. त्यानंतर दुर्दैवाने त्या महिलेचा मृत्यू झाला आणि डॉक्टरांनी पोलिसांना कळवलं.
पोलिसांनी मृत महिलेचा पती शैजू याची कसून चौकशी केली असता, आपल्या पत्नीने घरातील खोलीत गळफास लावून घेत आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला, असे त्याने सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळाची कसून तपासणी केली.
विवाहबाह्य संबंधांच्या संशयावरून उचलले टोकाचे पाऊल
मात्र तेथे गेल्यावर पोलिसांना वेगळाच संशय आला. अखेर त्यांनी मृत महिलेचा पती शैजू यालाच ताब्यात घेत त्याची पुन्हा कसून चौकशी केली असता, त्याने त्याचा गुन्हा कबूल केला. आपल्या पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीशी विवाहबाह्य संबंध आहेत, असा संशय शैजू याला होता, याच कारणामुळे त्याने तिची हत्या केली. आधी त्याने तिला जबरदस्ती दारू पाजली , ती बेशुद्ध झाल्यानंतर त्याने शालीने तिचा गळा आवळून तिची हत्या केली. आणि तिने गळफास घेऊन जीव देण्याचा प्रयत्न केल्याची, खोटी कहाणी रचली. अखेर पोलिसांनी त्याचे बिंग फोडलेच. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे.