ल्युडोच्या वादातून मुंबईत मित्राची हत्या, नैसर्गिक मृत्यूचं बिंग शेजाऱ्याने शोकसभेत फोडलं
52 वर्षीय तुकाराम नलवडे आणि त्यांचा 34 वर्षीय मित्र अमित राज पोपट उर्फ जिमी यांच्यात मोबाईलवर ल्युडो गेम खेळताना वाद झाले होते (Friend Online Ludo Mumbai)
मुंबई : ऑनलाईन ल्युडो (Online Ludo Game) खेळताना झालेल्या भांडणातून तरुणाने मित्राचीच हत्या केली. मुंबईतील मालाड परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. हे प्रकरण इतक्यावरच थांबले नाही, तर मित्राच्या मृत्यूनंतर बोरिवलीतील एका हॉस्पिटलमधून आरोपीने बनवट मृत्यूचा दाखला बनवून घेतला. मयत तरुणाच्या कुटुंबाला नैसर्गिक मृत्यू असल्याचं भासवून अंत्यसंस्कारही करण्यात आले. (Man kills Friend while playing Online Ludo Game in Mumbai)
शेजाऱ्याने शोकसभेत नैसर्गिक मृत्यूचं बिंग फोडलं
धक्कादायक म्हणजे मयत तरुणाची शोक सभा सुरु असताना उपस्थित राहिलेल्या एका शेजाऱ्याने हा प्रकार सांगितला. शेजाऱ्याने मृत व्यक्तीच्या पत्नीला सांगितले की ही नैसर्गिक घटना नसून मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करुन कलम 302 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
ल्युडो खेळताना जिंकणाऱ्या मित्राला मारहाण
पोलिसांच्या माहितीनुसार 17 मार्च 2021 रोजी 52 वर्षीय तुकाराम नलवडे आणि त्यांचा 34 वर्षीय मित्र अमित राज पोपट उर्फ जिमी हे मालाडमधील दारुवाला कंपाऊंड परिसरात मोबाईलवर ल्युडो गेम खेळत होते. या खेळात तुकाराम सारखे जिंकत होते. त्यामुळे आरोपी अमित त्यांच्यावर नाराज झाला. यावरुन दोघांमध्ये वादावादी झाली. रागाच्या भरात अमितने तुकाराम यांना मारहाण केली. मारहाण इतकी जबरदस्त होती की तुकाराम नलवडे यांचा जागीच मृत्यू झाला.
मृत्यूचा बनावट दाखला
तुकाराम यांच्या मृत्यूने अमित चांगलाच घाबरला. त्याने बोरिवलीतील एका खासगी हॉस्पिटलमधील रुग्णवाहिका चालकाची मदत घेतली. दहा हजार रुपये देऊन तुकाराम नलवडे यांच्या नैसर्गिक मृत्यूचा बनावट दाखला बनवून घेतला. तो मृत्यूचा दाखला नलवडे यांच्या कुटुंबीयांना दाखवला आणि त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचं भासवलं. त्यानंतर तुकाराम नलवडे यांच्या पार्थिवावर मालाडच्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारही करण्यात आले. परंतु शेजाऱ्याने शोकसभेत अमितचं पितळ उघडं पाडलं आणि या प्रकरणाचा पर्दाफाश झाला.
संबंधित बातम्या :
ल्युडोमध्ये बाबांची चीटिंग, 24 वर्षीय तरुणीची कोर्टात धाव
लुडो खेळताना तोंडावर खोकला, मित्राने ठोकला, पाच राऊंड फायर
(Man kills Friend while playing Online Ludo Game in Mumbai)