सुनील जाधव, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, कल्याण | 22 डिसेंबर 2023 : कल्याणमध्ये ऑनलाइन फ्रॉडचं एक प्रकरण उघडकीस आलं आहे. जिथे एका इसमाला लाखोंचा गंडा घालण्यात आला. वर्क फ्रॉर्म होमबाबत मेसेज करून गुगलवर पॉझिटिव्ह रिव्हयू व रेटींग दिल्यास तीन हजारापासून दहा हजाराची रक्कम मिळण्याचे आमिष दाखवत त्या इसमाला गंडवण्यात आले. त्यासाठी आधी त्या व्यक्तीच्या अकाऊट मध्ये दीडशे रुपये पाठवून विविध टास्क पूर्ण करण्यास सांगितले. नंतर मात्र त्याला तब्बल 11 लाख 31 हजारांचा ऑनलाइन गंडा घातल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी कल्याण महात्मा फुले पोलिसांनी अनोळखी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. सध्या ऑनलाईनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असून नागरिकांनी कुठल्याही बँकेचे व्यवहार मोबाईलच्या माध्यमातून जास्त करू नये असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.
नेमकं काय झालं ?
कल्याण पश्चिम येथील रामबाग परिसरात राहणाऱ्या दीपक देशपांडे नावाच्या पन्नास वर्षे व्यक्तीला एका अनोळखी मोबाईलधारक महिलेने व्हॉटसॲपवर मेसेज केला. वर्क फ्रॉम होम संदर्भात तो मेसेज होता. तसेच एक टेलिग्रामधारक महिला व इसम यांनी त्यांना मर्चंटचे कस्टमर वाढविण्यासाठी गुगलवर पॉझिटिव्ह रिव्हयू व रेटींग देण्यास सांगितले, आणि त्याबदल्यात तीन हजारापासून दहा हजाराची रक्कम मिळेल, असेही आमिष दाखवले. त्यासाठी देशपांडे यांच्या बँक अकाऊंटमध्ये सुरूवातील 150/ रूपये पाठविले. मात्र त्यानंतर विविध टास्ककरिता देशपांडे यांना एकूण 11 लाख 31 हजार 200 रूपये त्यांच्या वेगवेगळया बँक अकाऊंटवर ऑनलाईन पाठविण्यास सांगितले. मात्र ते पैसे काही देशपांडे यांना परत मिळाले नाहीत. आपली आर्थिकफसवणूक झाल्याचे लक्षात येताच देशपांडे यांनी कल्याण महात्मा फुले पोलिसांत धाव घेतसी. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी अनोळखी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. तसेच सध्या ऑनलाईन माध्यमातून मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असून नागरिकांनी कुठल्याही बँकेचे व्यवहार मोबाईलच्या माध्यमातून जास्त करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.