फक्त बाहेर जाऊन सिगारेट प्यायला सांगितलं, तेवढ्याचाच राग आला अन् भर दुकानातच… नेमकं काय झालं ?
केस कापण्यासाठी गेलेल्या एका इसमाचा सिगारेट ओढण्यावरून वाद झाला मात्र तो त्याच्या जीवावरच बेतला. झालेल्या भांडणाचे भयंकर परिणाम झाले.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील गुन्हेगारीच्या घटना वाढतनाच दिसत आहेत. सिगारेट ओढण्यावरून झालेल्या वादानंतर एका मुलाने एका व्यक्तीवर कात्रीने 9 वार (man stabbed) केले. या घटनेत तो इसम गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दक्षिण-पश्चिम दिल्लीतील किशनगड गावात ही घटना घडल्याचे पोलिसांनी सोमवारी सांगितले. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेअर कटिंगच्या दुकानात एका कथित मद्यधुंद मुलाने, 38 वर्षीय व्यक्तीवर कात्रीने अनेक वेळा हल्ला करून त्याला जखमी केले. खरं तर, अभय कुमार नावाचा एक व्यक्ती केस कापण्यासाठी न्हावीच्या दुकानात गेला होता. त्याचवेळी दुकान मालकाचा मुलगा मोहित महलवत (22) हा तेथे पोहोचला. तो दारू पिऊन दुकानातच सिगारेट ओढत होता.
सिगारेटवरू झाला होता वाद
अभयने त्याला दुकानाबाहेर सिगारेट ओढण्यास सांगितले. मात्र एवढ्याशा गोष्टीवरून मोहितने त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि रागाच्या भरात त्याचा संयम सुटला. रागाच्या भरात मोहितने दुकानात ठेवलेल्या कात्रीने अभय याच्यावर सपासप वार केले. अभय कुमारच्या शरीरावर नऊ जखमा होत्या, त्यापैकी चार वार हे छातीवर झाले, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
कलम 307 अन्वये गुन्हा दाखल
अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेत गंभीर जखमी झालेल्या इसमाला रुग्णालयात नेण्यात आले असून त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी सांगितले की, पीडित इसमाच्या साक्षीच्या आधारे किशनगड पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 307 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.