पुणे-मुंबई प्रवासात कॉफी प्यायला अन् 80 तास बेशुद्ध झाला; त्याच्यासोबत नेमकं काय घडलं ?
प्रवास करताना कोणी अनोळखी व्यक्तीने दिलेला खाऊ-पिऊ नये अशी सूचना दिली जाते. मात्र तरीही काहीवेळा असा प्रसंग घडतो की समोरच्याच्या बोलण्यास आपण भुलतो आणि नंतर पश्चातापाची वेळ येते.
राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले असून घराबाहेर जातानाही लोका जीव मुठीत धरून जगत आहेत. आता प्रवासही फारसा सोपा राहिलेला नाही. प्रवास करताना कोणी अनोळखी व्यक्तीने दिलेला खाऊ-पिऊ नये अशी सूचना दिली जाते. मात्र तरीही काहीवेळा असा प्रसंग घडतो की समोरच्याच्या बोलण्यास आपण भुलतो आणि नंतर पश्चातापाची वेळ येते. अशीच काहीशी घटना पुण्यातील एका इसमासोबत घडली असून पुणे-मुंबई प्रवास करताना सहप्रवाशाशी ओळख झाली आणि त्याने दिलेली कॉफी प्यायल्यानंतर तो इसम बेशुद्धच झाला. तब्बल 80 तासांनी तो शुद्धीवर आला तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता आणि त्याच्याकडील लाखोंचे दागिने गमावून बसला. याप्रकरणी पोलिसांत तक्रार केल्यानंतर त्यांन कसून तपास केला आणि अखेर आरोपीला उत्तर प्रदेशातून शोधून काढत अटक केली.
एखाद्या चित्रपटाच्या कहाणीप्रमाणे वाटणारी ही घटना खरीच घडली असून प्रवासात नेहमी सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नेमकं काय घडलं ?
पुण्यातील बाणेर येथे वास्तव्यास असलेले व्यावसायिक शैलेंद्र साठे (५७) हे कामानिमित्त १४ जून रोजी मुंबईला जात होते. वाकड बस थांबा येथे ते शिवनेरी बसमध्ये चढले. थोड्या वेळाने ही बस द्रुतगती महामार्गावरील खालापूर फुड मॉल येथे थांबली. तेव्हा साठे यांच्या सहप्रवाशाने त्यांना कॉफी आणून दिली. बसमध्ये त्याच्याशी ओळख, गप्पा झाल्याने साठे यांनाही काही संशय आला नाही आणि त्यांनी निर्धास्तपण ती कॉफी प्यायली. कॉफी पिऊन झाल्यानंतर शैलेंद्र साठे हे बसमध्ये आपल्या जागेवर जाऊन बसले. तर त्यांच्या मागोमाग तो सहप्रवासीही त्यांच्या बाजूच्या सीटवर येऊन बसला. मात्र काही वेळाने शैलेंद्र यांच्या उजव्या हाताला इंजेक्शन टोचल्यासारखे झाले आणि त्यांची शुद्धच हरपली.
त्यानंतर अनेक दिवस ते बेशुद्ध होते. अखेर तब्बल ८० तासांनी , १८ जून रोजी जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा ते बसमध्ये नव्हे तर ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये होते. तेव्हा सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांच्याकडे असलेले सोन्याचे दागिने, मोबाइल व बॅग असा ३ लाख ७० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली.
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. टेक्नॉलॉजीच्या मदतीने तपास केला असता तो आरोपी उत्तर प्रदेशातील मेरठ येथे असल्याचे पोलिसांना समजले. त्या माहितीच्या आधारावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांनी तेथे पोलिसांचे पथके पाठवले. तीन दिवस पाळत ठेऊन पोलिसांनी अखेर आरोपी युनुस शेख (५२) याला अटक केली.