डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरात मंगळसूत्र, सोनसाखळी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत होत आहे. एकाच दिवशी रस्त्याने पायी जाणाऱ्या तीन महिलांच्या गळ्यातून दुचाकीस्वारांनी मंगळसूत्र हिसकावून पळ काढल्याची घटना घडली. या घटनेत एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. एकाच दिवसात या चोरांनी दीड लाखाहून अधिक रकमेचा सोन्याचा ऐवज लुटला. सध्या डोंबिवलीतील मानपाडा कल्याणमधील बाजारपेठ आणि कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तिन्ही महिलांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी विविध टीम बनवत आरोपीचा शोध सुरू केला आहे. मात्र ही बातमी परिसरात पसरताच महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीला बेड्या ठोकण्याची मागणी कल्याण डोंबिवलीकरांकडून होत आहे.
कल्याण डोंबिवली परिसरातील रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोन्याचा ऐवज लुटून नेण्याच्या घटना वाढतच चालल्याने महिला वर्गामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. बुधवारी दिवसभरात डोंबिवली, कल्याणमध्ये दुचाकीवरुन आलेल्या भुरट्या चोरांनी तीन महिलांच्या गळ्यातील दीड लाखाहून अधिक रकमेचा सोन्याचा ऐवज लुटले आहे.
पहली घटना कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी भागात राहाणाऱ्या 49 वर्षीय रेखा राम धुमाळे या सकाळी साडे दहा वाजता विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळून पायी चालल्या होत्या. यावेळी दुचाकीवरुन दोन जण वेगाने त्याच्या जवळ आले आणि त्यांनी काही कळण्याच्या आत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. रेखा यांनी चोरट्यांना विरोध केला, पण चोरट्यांनी त्यांना जमिनीवर ढकलून देऊन दुखापत करुन पळून गेले. यात रेखा किरकोळ जखमी झाली. या प्रकरणी त्यांनी कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दुसरी घटना डोंबिवली एमआयडीसीती परिसरात घडली आहे. या घटनेत डोंबिवलीतील सुदर्शन नगरमध्ये राहणाऱ्या 72 वर्षीय अरुंधती कुलकर्णी या सकाळी साडे सात वाजता आपल्या सुनेबरोबर मॉर्निंग वॉक करण्यासाठी बाहेर पडल्या. यावेळी सेंट जोसेफ शाळेच्या बाजूने दुचाकीवरुन दोन जण आले. त्यांनी अरुंधती यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
तर तिसरी घटना कल्याण पश्चिमेतील काळा तलाव परिसरात राहणाऱ्या 51 वर्षीय विजया लासुरे या सकाळी सव्वा दहाच्या सुमारास पायी जात होत्या. दुचाकीवरुन दोन जण त्यांच्याजवळ अचानक आले. त्यांनी मानेवर जोराने फटका मारुन त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. विजया यांनी चोरट्यांना विरोध केला. या झटापटीत चोरट्यांनी त्यांचे कपडे फाडून मंगळसूत्र लंपास केले. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.