कल्याण : फिरायला जाणाऱ्या महिलांना टार्गेट करुन लुटणाऱ्या चोरट्याला अखेर मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सीसीटीव्ही आणि गुप्त माहितीवरून मानपाडा पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपीकडून 60 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 8 मोटार सायकली, 5 मोबाईल फोन असा एकूण 4,25,000 रूपये किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. हा चोरटा आधी परिसरातील गाडी चोरायच्या. त्यानंतर चोरीच्या गाडीवरून सकाळी आणि संध्याकाळी वॉकसाठी येणाऱ्या वयोवृद्ध महिलांच्या गळ्यातील चैन आणि मोबाईल लंपास करायचा. मुस्तफा उर्फ मुस्सु जाफर सैयद उर्फ इराणी असे या आरोपीचे नाव असून, पोलिसांकडून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. इराणीवर याआधी 21 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असून, आता याने 13 ठाणे जिल्ह्यात 13 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
डोंबिवली नांदीवली पूर्व परिसरात 3 तारखेला शरद पुंडलीक कडुकर नावाचा व्यक्ती सकाळी पायी चालत जात असताना पाठीमागून आलेल्या मोटरसायकलस्वारांनी त्यांच्या हातातला मोबाईल खेचून नेला. याप्रकरणी तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या तक्रारीनंतर परिमंडळ 3 कल्याणचे पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश मदने, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल तारमळे यांच्या विविध टीमने आरोपीचा शोध सुरू केला होता.
सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीनुसार पोलिसांनी शहाड रेल्वे स्टेशन परिसरातून मुस्तफा उर्फ मुस्सु जाफर सैयद उर्फ इराणी नावाच्या आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीला खाकीचा धाक दाखवत त्याची विचारपूस केली असता, त्याने ठाणे जिल्ह्यात 13 ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली. सध्या पोलिसांनी याला ताब्यात घेत याचा दुसऱ्या साथीदाराचा शोध सुरू केला आहे.