मनसुख हिरेन प्रकरणात विरारच्या बांधकाम व्यावसायिकाचा ठाणे पोलिसांवर गंभीर आरोप
बांधकाम व्यवसायिक मयुरेश राऊत यांनी ठाणे पोलिसांवर गंभीर आरोप केलाय. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आपल्या चोरी झालेल्या मर्सिडीज गाडीचा वापर झाल्याचा संशय राऊत यांनी व्यक्त केलाय.
मुंबई : मनसुख हिरेन प्रकरणात विरारमधील एक बांधकाम व्यवसायिक मयुरेश राऊत यांनी ठाणे पोलिसांवर गंभीर आरोप केलाय. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आपल्या चोरी झालेल्या मर्सिडीज गाडीचा वापर झाल्याचा संशय राऊत यांनी व्यक्त केलाय. 2017 मध्ये परमबीर सिंग ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना एन्टी एक्सटॉर्शन सेलमार्फत मला पोलीस ठाण्यात बोलावून घेत बळजबरीने डांबून ठेवलं. माझ्या दोन गाड्या मर्सिडीज आणि दुसरी गाडीही घेऊन गेले, असा आरोप राऊत यांनी केलाय. (Mayuresh Raut serious allegations on Thane police in Mansukh Hiren murder case)
ठाणे पोलिसांच्या या कृत्याविरोधात आपण न्यायालयात गेलो. न्यायालयाने मला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. मी सर्वत्र गेलो पण कुणीही दाद दिली नाही, अशी खंतही राऊत यांनी व्यक्त केलीय. कोथमिरे यांना निलंबित करावं अशी मागणी करतानाच पोलिसांनी अनेकांची संपत्ती लुटल्याचा आरोपही त्यांनी केलाय. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात माझ्या गाडीचा वापर झाला असावा. NIA आणि राज्यांच्या पोलिसांना माझी विनंती आहे की, त्यांनी याची दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केलीय.
‘..तर माझीही अवस्था मनसुख हिरेनसारखीच झाली असती’
मयुरेश राऊत यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत, आपण कोर्टात गेलो नसतो तर माझीही अवस्था मनसुख हिरेनसारखीच झाली असती, अशी भीतीही राऊत यांनी व्यक्त केली आहे. कोथमिरे यांनी गाडी नेली, मग ठाण्याच्या टोयोटा शोरुममध्ये सर्व्हिसिंग केली. त्याची कागदपत्रंही आहेत, असंही राऊत यांनी सांगितलं. 2017 पासून आपण तक्रार करत आहोत पण कुणीही दाद देत नाही. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची काल भेट घेतली. त्यांनी याबाबत चौकशीचं आश्वासन दिल्याचंही राऊतांनी सांगितलं. सचिन वाझेचं स्टेटमेंट आहे की, जिलेटिनचे स्टिक प्रदीप शर्मा यांनी दिले होते. 2016 ला मी गाडी विकत घेतली. 2017 ला त्यांनी माझ्या दोन्ही गाड्या चोरल्या. 3 दिवस मला कोंडून ठेवलं. हे खंडणी पथक आहे. माझ्यासारखे 50 जण आहेत ज्यांच्यासोबत हा प्रकार घडलाय, असा आरोपही त्यांनी केलाय.
संबंधित बातम्या :
मनसुख हिरेन यांची हत्या नेमकी कशी झाली?, कुणी केली? वाझेंचा संबंध काय?; वाचा, ATS नं काय सांगितलं?
Mayuresh Raut serious allegations on Thane police in Mansukh Hiren murder case