Kalyan Crime : अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर विशाल गवळीने काय काय केलं ?
घरातून खाऊ आणण्यासाठी बाहेर पडलेल्या 13 वर्षांच्या मुलीला फूस लावून घरात आणलं आणि तिच्यावर अमानुष अत्याचार केला. या गुन्ह्याला वाचा फुटू नये म्हणून तिची हत्या करत आणखी एक गुन्हा करणारा आरोपी विशाल गवळी हा सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलं आहे. मुलीच्या हत्येनंतर त्याने काय काय केलं याचा संपूर्ण घटनाक्रमच समोर आला आहे.
चिप्स आणण्यासाठी घरातून माझी मुलगी बाहेर पडली पण ती घरीच परत आलीच नाही, तिच्या मृत्यूची बातमीच आमच्यासमोर आली. कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आला, तिच्या वडिलांचा हृदय पिळवटून टाकणारा हा आक्रोश पाहून सगळेच स्तब्ध झाले, पण त्यांच्या मुलीचा जीव घेण्यास कारणीभूत ठरलेला आरोपी विशाल गवळी हा एक असा गुन्हेगार आहे, ज्याच्यासाठी सराईत हा शब्दपण कमी पडेल. तो अतिशय निर्ढावलेला आणि माजोरडा गुन्हेगार असल्याचं समो आलं आहे. वर्षभरापूर्वी देखील याच विशालने क्लासवरून परत येणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून भररस्त्यात तिच्यावर अत्याचाराचा प्रय्तन केला होता, त्यावेळी अटक झाल्यानंतर त्या माजोरड्या विशालेन व्हिक्टरी अर्थात विजयाचं चिन्ह दाखवत कायद्याचा काहीच धाक नसल्याचं दर्शवलं होतं.
याप्रकरणी काही काळ तुरूंगाची हवा खाल्ल्यावर तो जामीनावर बाहेर आला आणि पुन्हा मोकाट सुटला. आधी केलेल्या गुन्ह्याच्या जराही पश्चाताप न बाळगता त्याने तीन दिवसांपूर्वी पुन्हा असाच एक गुन्हा केला. 13 वर्षांच्या मुलीला त्याने फूस लावली, घरात नेल, अमानुषपणे लैंगिक अत्याचार केला आणि या गुन्ह्याला वाचा फुटू नये म्हणून तिची हत्या करत आणखी एक गुन्हा केला. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याची पत्नी कामावरून घरी आल्यावर त्याने निर्लज्जपणे हा सगळा प्रकार तिला सांगितला आणि तिनेही त्याला यामध्ये साथ देत त्या अल्पवयीन मुलाच्या खुनाचे पुरावे मिटवण्यात मदत केली, तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यातही साथ दिली आणि त्यानंतर आपल्याच गुन्हेगार नवऱ्याला पळून जाण्यातही मदत केल्याचे समोर आले आहे. त्या मुलीच्या हत्येनंतर त्याने काय काय केलं याचा संपूर्ण घटनाक्रमच समोर आला आहे.
मुलीच्या हत्येनंतर आरोपीने काय काय केलं ?
1) विशाल गवळी हा संध्याकाळी 5 वाजता मुलीला घरी घेऊन आला होता. त्यानंतर त्याने तिच्याशी गैरकृत्य केलं आणि नंतर तिची हत्या केली. तिची हत्या केल्यानंतर त्याने एका मोठ्या बॅगेत तिचा छिन्नविछिन्न मृतदेह ठेवला होता.
2) त्यानंतर त्याची पत्नी साक्षी ही संध्याकाळी 7 वाजता घरी आली. ती बँकेत काम करते. साक्षी घरी आल्यावर तेव्हा विशालने झालेला प्रकार तिला सांगितला. हा प्रकार ऐकून ती हैराण झाली.
3) त्यानंतर दोघा नवरा बायकोने एकत्र बसून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्लान आखला प्रथम त्यांनी घरातील संपूर्ण रक्त पुसून काढले. रात्री 8.30 वाजता विशालने मित्राची रिक्षा बोलावून घेतली. 9 वाजता ते रिक्षात मृतदेह टाकून बापगावच्या दिशेने रवाना झाले. त्यानंतर त्यांनी बापगावला अज्ञातस्थळी मृतदेह फेकला आणि तिथून पलायन केलं.
4) त्यानंतर त्याच्या पत्नीने साक्षीने त्याला कल्याणमध्ये थांबू नकोस असे सांगत माझ्या माहेरी निघून जा असाही सल्ला दिला.
5) कल्याणमधून बाहेर पडण्यापूर्वी आरोपी विशालने एका दुकानातून मद्य विकत घेतलं. त्यानंतर त्याने ठाणे, तिथून दादर गाठलं. दादरवरून त्याने एक्स्प्रेस ट्रेन पकडली आणि शेगाव गाठलं अशी माहिती पोलिसांनी दिली.
6) कल्याणमधून बाहेर पडताच त्याने त्याचा फोन बंद ठेवल्याचेही समोर आले आहे.
7) सीसीटीव्ही फुटेज आणि नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी विशालला शेगांवमधून बेड्या ठोकल्या.
8) गुन्हे शाखेचे डीसीपी अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेने ही कारवाई केली.