आई-वडिलांच्या भांडणात पडली मुलगी, बापाने केले असे काही ऐकून धक्काच बसेल
गुलाब नेहमी प्रमाणे दारु पिऊन घरी आला आणि पत्नीशी भांडू लागला. यावेळी आई-वडिलांचे भांडण पाहून 16 वर्षाची मुलगी मध्ये पडली.
चंद्रपूर : वडिल दारुच्या नशेत आईसोबत भांडण (Dispute) करत होते. भांडण इतक्या टोकाला गेले की सोडवण्यासाठी मुलगी मध्ये पडली. मात्र मध्यस्थी करणे मुलीला महागात पडले आहे. आईची बाजू घेऊन बोलल्याने वडिलांनीच मुलीच्या गळ्यावर वार करुन तिला गंभीर जखमी (Injured) केल्याची धक्कादायक चंद्रपूरमध्ये घडली आहे. पोलिसांनी आरोपी पित्याला अटक (Arrest) केले आहे. गुलाब कानझोडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपीला दारुचे व्यसन होते
चंद्रपूरमधील कोरपना तालुक्यातील गडचांदूर गावात राहणाऱ्या गुलाब कानझोडे याला दारुचे व्यसन होते. तो रोज दारु पिऊन घरी यायचा आणि पत्नीशी भांडण करायचा. त्याच्या स्वभावाला घरचे कंटाळले होते.
आई-वडिलांच्या भांडणात मध्ये पडल्याने हल्ला
गुलाब नेहमी प्रमाणे दारु पिऊन घरी आला आणि पत्नीशी भांडू लागला. यावेळी आई-वडिलांचे भांडण पाहून 16 वर्षाची मुलगी मध्ये पडली. मुलगी आईच्या बाजूने बोलत असल्यामुळे बापाचा संताप अनावर झाला अन् बापाने मुलीवर हल्ला केला.
हल्ल्यात गंभीर जखमी मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु
जखमी मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी मुलीला प्राथमिक उपचारानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडित मुलगी इयत्ता दहावीत शिकत होती.
घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीला पोलिसांकडून अटक
मुलीवर हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला. पोलिसांनी त्याला शिताफीने पकडले आहे. आरोपीवर 307 अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गडचांदूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.