Kalyan Crime : लेकीसह बाहेरगावी निघालेला तो तिकीट काढायला गेला, परत येऊन बघतो तर मुलगी…
कल्याण रेल्वे स्टेशनवरून एका 14 वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आलं आहे. रेल्वे तिकीट खिडकीजवळ उभी असलेली ही मुलगी गायब झाली. तिच्या वडिलांनी अख्खं रेल्वे स्टेशन पिंजून काढलं, नातेवाईकांकडेही चौकशी केली. अखेर वडिलांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात धाव घेत मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला..
सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कल्याण | 24 नोव्हेंबर 2023 : इगतपुरीहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ट्रेनमधून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना ताजी असतानाच आत कल्याण रेल्वे स्थानकावरही असाच काहीसा प्रकार घडला आहे. कल्याण रेल्वे स्टेशनवरून एका 14 वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आलं आहे. रेल्वे तिकीट खिडकीजवळ उभी असलेली ही मुलगी गायब झाली. तिच्या वडिलांनी अख्खं रेल्वे स्टेशन पिंजून काढलं, नातेवाईकांकडेही चौकशी केली. मात्र तिचा काहीच पत्ता लागला नाही. अखेर मुलीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दिली असून पोलीस मुलीचा शोध घेत आहे . मात्र या घटनेने पुन्हा एकदा स्टेशन परिसरात सुरक्षेचा प्रश्न आहे ऐरणीवर आला आहे
लेकीसह बाहेरगावी जात होते वडील
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात शनिवारी ( १८ नोव्हेंबर) रोजी ही घटना घडली. त्या दिवशी रात्री साडेअकराच्या सुमारास ती मुलगी आणि वडील बाहेरगावी जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्टेशन येथे पोहोचले. मात्र तिकीट काढायला भलीमोठी रांग होती. त्यामुळे त्या मुलीच्या वडिलांनी कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवरील रेल्वे तिकीट खिडकीजवळ आपले समान ठेवत मुलीलाही तिथेच उभं राहण्यास सांगितलं. आणि ते तिकीट काढायला गेले. पण बरीच रांग असल्याने त्यांना परत यायलाही उशीर झाला.
तिकीट काढल्यावर ते खिडकीजवळ आले तर काय, सामान तिथेच होते, पण त्यांची मुलगी कुठेच दिसत नव्हती. हे पाहून ते खूप घाबरले, सैरभैर झाले. मुलीच्या नावाने हाका मारत त्यांनी अख्खं रेल्वे स्टेशन पिंजून काढलं, आजूबाजूच्या परिसरातही शोधाशोध केली. मात्र त्यांना ती कुठेही सापडली नाही. त्यांनी त्यांचे कुटुंबीय, नातेवाईकांकडेही विचारणा केली. मात्र ती तेथेही पोहोचली नव्हती. अखेर तिच्या वडिलांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात धाव घेत मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने मुलीचा शोध घेत आहेत. मात्र या घटनेने स्टेशन परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुन्हा एकदा स्टेशन परिसरात कायदा सुरक्षेचा प्रश्न आहे ऐरणीवर आला असून स्टेशन परिसरात पोलिसांनी गस्ती वाढवावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.