अल्पवयीन विवाहिता सहा महिन्यांची गर्भवती, माहेर-सासरच्या लोकांविरोधात गुन्हे
याप्रकरणी मुलीच्या पतीसह माहेर व सासरच्या लोकांविरोधात लाखनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तेजस मोहतुरे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, भंडारा : बालविवाहासह अल्पवयीन मुलींचे विवाह रोखण्यासाठी शासकीय व सामाजिक पातळीवर विशेष प्रयत्न होत असतात. तरीही अजून हा प्रकार थांबलेला नाही. यांची प्रचिती भंडारा (Bhandara) जिल्ह्यात आली. एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्यात आला. इतकेच नव्हे तर ती 6 महिन्यांची गर्भवतीसुद्धा (pregnant) असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी लाखनी पोलिसात (Lakhni Police) माहेर व सासरच्या लोकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी ही मुलगी 18 वर्षापेक्षा कमी वयाची असल्याचे ग्रामसेवकाच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत पोलीस तक्रार केली.
याप्रकरणी मुलीच्या पतीसह माहेर व सासरच्या लोकांविरोधात लाखनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लग्नाच्या वेळी मुलीचे वय 17 वर्षे 3 महिने 5 दिवस होते. असे असताना आई वडिलांनी तिचा विवाह सडक अर्जुनी ( जि. गोंदिया) येथील युवकासोबत लावून दिला. अल्पवयीन मुलीचा विवाह फेब्रुवारी 2022 रोजी लावून देण्यात आला.
मुलगी सज्ञान नाही, ही बाब माहेर आणि सासरकडील लोकांना माहीत होती. तरीही त्यांनी कायद्याचे उल्लंघन केले. लग्नानंतर ही मुलगी 6 महिन्यांची गर्भवतीसुद्धा आहे.
ग्रामसेवक नेपाल दशरथ गोटेफोडे यांच्या फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कलम 376(2) (एन) 376 (2) (जे)34 भा.द.वि. सह कलम 4, 6, बाललैंगिक अत्याचार अधिनियम, बालविवाह प्रतिबंधक अधिनियमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला.
मुलीचे आई व वडील तसेच पती हितेश राजेश वासनिक (24) व सासू, सासरे यांच्यासह इतर नातेवाइकांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लाखनी पोलीस करीत आहेत.