Mira Road Murder : अनेक डेटिंग ॲप्स, महिलांशीही चॅटिंग, सरस्वतीच्या मारेकऱ्याच्या मोबाईलने उघड केली अनेक रहस्य

| Updated on: Jun 15, 2023 | 10:35 AM

Murder Case Updates : सरस्वती हिची हत्या करून मृतदेहाचे तुकडे करणाऱ्या मनोज सानेबद्दल रोज नवनवी माहिती समोर येत आहे. अत्यंत शांतपणे ही क्रूर घटना करणारा मनोज हा अनेक डेटिंग ॲप्सवर ॲक्टिव्ह होता.

Mira Road Murder : अनेक डेटिंग ॲप्स, महिलांशीही चॅटिंग, सरस्वतीच्या मारेकऱ्याच्या मोबाईलने उघड केली अनेक रहस्य
Follow us on

मुंबई : मीरा-रोड येथे सोबत राहणाऱ्या पार्टनरची हत्या (Mira Road Murder) करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते कुत्र्यांना खाऊ घालणारा निर्दयी खुनी मनोज साने 16 जूनपर्यंत पोलिस कोठडीत आहे. या चौकशीत त्याच्याशी संबंधित अनेक पुरावे (evidence) पोलिसांच्या हाती लागले आहेत. याप्रकरणी रोज नवनवे खुलासे होत असून मनोजबद्दल बरीच माहिती समोर येत आहे. मृत सरस्वती वैद्य हिच्या शरीराचे ३५ अवयव पोलिसांना आतापर्यंत मिळाले आहेत. बाकीचे अवयव कुत्र्यांना खायला घातल्याने सापडले नाहीत. दरम्यान, सरस्वतीचा डीएनए रिपोर्टही आला आहे.

तिच्या बहिणींशी डीएनए जुळला आहे. यावरून सरस्वतीची ओळख पटली आहे. पण डीएनए अहवाल अजून पूर्ण व्हायचा आहे. दरम्यान, मनोज सानेबाबत पोलिसांना अनेक नवीन गोष्टी समोर आल्या आहेत. मनोज साने हा केवळ क्रूरच नाही, तर तो वासनांधही आहे. त्याच्या मोबाईलने अनेक गुपितं उलगडली आहे.
तो विविध डेटिंग ॲप्सवर ॲक्टिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अनेक महिलांशी चॅटिंग केल्याचे पुरावेही समोर आले आहेत. तो एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याची बाब यापूर्वीच समोर आली आहे. पोलिसांना एचआयव्हीच्या उपचारात वापरण्यात येणारी काही औषधे सापडली होती. मात्र सध्या यासंदर्भातील वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच याची पुष्टी होणार आहे.

सरस्वती मुलीसारखी असल्याचा केला होता दावा, पण मंदिरात लग्न केल्याचेही आले समोर

सरस्वती वैद्य यांचे कोणते भाग बेपत्ता आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र मनोज साने यांनी सरस्वतीला कोणत्या मंदिरात नेऊन तिच्याशी लग्न केले, याबद्दलची माहिती समोर आली आहे. वसईजवळील नालासोपारा पूर्व येथील तुंगारेश्वर मंदिरात मनोज आणि सरस्वती यांचा विवाह झाला. यानंतर दोघेही तीन वर्षांपूर्वी मीरा रोडच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले. पोलिसांनी आतापर्यंत मनोज आणि सरस्वतीशी संबंधित 20 ते 25 जणांचे जबाब नोंदवले आहेत.

रेल्वे ट्रॅकजवळ फेकले अनेक अवयव

मृतदेहाचे अनेक भाग रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या नाल्यात फेकल्याची कबुलीही मनोजन पोलीस चौकशीदरम्यान दिली आहे. यापूर्वी केलेल्या चौकशीत त्याने एकही तुकडा फेकून दिला नसल्याचे सांगितले होते. नाल्यात फेकलेले सरस्वतीचे अवयव शोधण्याचा प्रयत्न मीरा-भाईंदर महापालिकेसह पोलिस करत आहेत.

सानेने सरस्वतीची हत्या केली तेव्हा तिचे रक्त भिंतींवर उडाल्याचेही चौकशीत समोर आले आहे. रक्ताचे डाग पाहून तो घाबरला आणि ते डाग लपवण्यासाठी त्याने भिंतींवर वर्तमानपत्रे चिकटवली.

प्लान करून केला मर्डर, आधीच केली तयारी

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनोज साने याने ३-४ जूनच्या मध्यरात्री १० ते १२ वाजण्याच्या सुमारास सरस्वतीची हत्या केली. ही नियोजित हत्या होती. हत्येच्या काही महिन्यांपूर्वी त्याने मार्बल कटर मशीन खरेदी केले होते. 4 जून रोजी त्याने झाड कापण्याचे मशीनही विकत घेतल्याचे समोर आले आहे.

आपण सरस्वतीचा खून केला नसल्याचा दावा साने याने केला आहे. सरस्वतीच्या आत्महत्येनंतर आपल्यावर आरोप होण्याच्या भीतीने तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्याने केला. परंतु जे पुरावे समोर येत आहेत त्यावरून साने यानेच सरस्वतीची निर्घृण हत्या केली आणि नंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असे दिसून येते. संपूर्ण नियोजन करून ही घटना घडवून आणल्याचेही पुराव्यांवरून दिसत आहे.