कल्याण बाजारपेठ परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ, व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण
कल्याणमध्ये बाजारपेठ परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. अहिल्याबाई चौक परिसरात चोरीच्या घटनेने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
कल्याण / सुनील जाधव : कल्याण पश्चिमेतील अहिल्याबाई चौक परिसरात एका मोबाईलच्या दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी डल्ला मारला. चोरटे 70 हजाराचे मोबाईल घेऊन पसार झाला. मात्र चोरट्यांचा हा सर्व उद्योग दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बाजारपेठ पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत. चोरीची घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पहाटे दुकानाचे शटर तोडून चोरी
कल्याण पश्चिम येथील अहिल्याबाई चौक परिसरात मोबी वर्ल्ड नावाचे दुकान आहे. या दुकानात काल पहाटे तीन अज्ञात चोरांनी दुकानाचे शटर तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानांमध्ये असलेले 70 हजाराचे मोबाईल घेऊन पसार झाला. चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सकाळी दुकानमालक दुकान उघडण्यास आला असता चोरीची घटना उघडकीस आली.
यानंतर दुकानमालक कुमारचंदन पवनकुमार झा यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यानंतर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध घेत आहेत.
नाशिकमध्ये सापळा रचून चोरट्यांना अटक
नाशिकच्या अंबड पोलिसांनी तिघा संशयित आरोपींकडून चोरीचे 20 मोबाईल आणि गुन्ह्यातील दोन मोटरसायकल असा एकूण अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अंबड पोलिसांना अंबड एमआयडीसीत काही चोर येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने या तिघा संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तब्बल 20 मोबाईल आणि दोन मोटरसायकल जप्त केल्या.