सर्वात सुंदर मॉडेलच्या आयुष्यातील ‘ती’ शेवटची रात्र… हॉटेलमधील रुम नंबर 111मध्ये काय घडलं ?
मॉडेल दिव्या पाहुजा हिच्या हत्येमुळे एकच खळबळ माजली आहे. गुडगावच्या ज्या हॉटेलच्या रुम नंबर 111मध्ये दिव्या हिची हत्या झाली, त्याच रूममध्ये (हत्येचा आरोप असलेला) अभिजीत सिंग आधीच पोहोचला होता

Model Divya Pahuja Murder Case : मॉडेल दिव्या पाहुजा हिच्या हत्येमुळे एकच खळबळ माजली आहे. गुडगावच्या ज्या हॉटेलच्या रुम नंबर 111मध्ये दिव्या हिची हत्या झाली, त्याच रूममध्ये (हत्येचा आरोप असलेला) अभिजीत सिंग आधीच पोहोचला होता. तो त्याच्या ओळखीच्या व्यक्तीसोबत तेथे आला होता. तेथे दिव्याही आली. मात्र दिव्या आणि अभिजीतमध्ये तेथे काही कारणावरून भांडण झालं आणि त्यानंतर हॉटेल मालक अभिजीतने दिव्याला गोळ्या घालून तिची हत्या केली.
दिव्या पाहुजाच्या हत्येप्रकरणी आणि विशेषत: तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या संदर्भात, हॉटेलच्या खोलीतील सीसीटीव्ही फुटेजवरून अशी माहिती समोर आली आहे की, अभिजीत आणि त्याच्या साथीदारांनी मिळून दिव्याचा मृतदेह बीएमडब्ल्यूच्या डिकीमध्ये ठेवला आणि त्यानंतर ते फरार झाले. पोलिसांच्या सांगण्यानुसार, दिव्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याची बीएमडब्ल्यू कार दिल्याचे आणि त्याच्या दोन गुंडांना दहा लाख रुपये दिल्याची कबुली अभिजीतने दिली आहे.
तिघांना अटक
या हत्याकांडात तीन जणांचा सहभाग होता, त्यांनाही पोलिसांनी पकडले आहे. मात्र, आजतागायत दिव्याचा मृतदेह सापडलेला नसून तो मृतेदह नेण्यासाठी वापरण्यात आलेल्या कारचाही काही ठावठिकाणा लागलेला नाही. या हत्याकांडातील आरोपींपैकी अभिजीत हा हॉटेलचा मालक आहे, तर प्रकाश आणि इंद्रजीत हॉटेलमध्ये काम करायचे. दिव्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्या दोघांनी अभिजीतला मदत केली होती. साहजिकच या सगळ्यामुळे तपास आणखी गुंतागुंतीचा झाला आहे.
सात वर्ष जेलमध्ये होती दिव्या
मुंबईतील एका हॉटेलमध्ये हरियाणाचा गँगस्टर संदीप गडोलीचे एनकाऊंटर झाले होते. त्यानंतर मॉडेल दिव्या पाहुजा ही सात वर्षांसाठी तुरुंगात होती, काही महिन्यांपूर्वीच तिला जामीन मिळाला होता. यानंतर मंगळवारी, २ जानेवारीच्या रात्री, दिव्याची गुरुग्राममधील हॉटेलमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बुधवारी पोलिसांनी ही माहिती दिली. 27 वर्षीय दिव्यावर मंगळवारी रात्री हॉटेलच्या खोलीत गोळ्या झाडण्यात आल्या.
त्या हॉटेलचा मालक अभिजीत सिंगचे काही आक्षेपार्ह फोटो दिव्याकडे होते, त्याचाच वापर करून की अभिजीतला ब्लॅकमेल करून पैसे उकळत होती, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पण दिव्याच्या कुटुंबीयांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.
सीसीटीव्हीमुळे उघड झाला गुन्हा
आत्तापर्यंत या हत्येप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींमध्ये हॉटेल मालक अभिजीत सिंग (56), हेमराज (28) आणि ओम प्रकाश (23) यांचा समावेश आहे. हॉटेल मालक अभिजीत मूळचा मॉडेल हिस्सारचा रहिवासी आहे. तर हेमराज हा नेपाळचा रहिवासी आहे आणि ओमप्रकाश हा पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी येथील रहिवासी आहे. पोलिसांना एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे, ज्यामध्ये हे आरोपी दिव्याचा मृतदेह एका पांढऱ्या चादरीत गुंडाळून हॉटेल सिटी पॉइंटच्या लॉबीमध्ये खेचताना त्यामध्ये कॅप्चर झाले.
दिव्याने अभिजीतचे आक्षेपार्ह फोटो काढून त्याला ब्लॅकमेल करून पैसे उकळले होते, म्हणूनच अभिजीतने दिव्याची गोळ्या झाडून हत्या केली, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पण तिच्या बहिणीने मात्र या सर्व गोष्टींचा इन्कार केला आहे. पण मुंबईत मारला गेला गँगस्टर संदीप गाडोलीच्या बहीणीने आणि भावानेच दिव्याला मारण्यासाठी अभिजीतला पैसे दिल्याचा आरोप, तिच्या बहिणीने केला. याप्रकरणी दिव्याची बहीण नयना पाहुजा हिच्या तक्रारीवरून सेक्टर 14 पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलीस चौकशी करत आहेत.
काय म्हणाले पोलिस ?
2 जानेवारीला अभिजीत हा दिव्या पाहुजासोबत हॉटेल सिटी पॉइंट येथे आला होता. त्याला तिच्या फोनमधून फोटो डिलीट करायचे होते, पण दिव्याने तिला फोनचा पासवर्ड सांगितला नाही. त्यामुळे हॉटेलमध्ये साफसफाई आणि रिसेप्शनचे काम करणाऱ्या हेमराज आणि ओमप्रकाश यांच्यासह अभिजीतने दिव्याची गोळ्या झाडून हत्या केली, असे अभिजीतने कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर तिचा मृतदेह कारच्या डिक्कीत ठेवण्यात आला . यानंतर अभिजीतने त्याच्या इतर दोन साथीदारांना बोलावून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कार त्यांच्या ताब्यात दिली. आरोपींना पकडण्यासाठी आणि मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक छापे मारत आहेत.