अल्पवयीन बलिकेवर विनयभंग प्रकरणी आरोपीला सात वर्षानंतर शिक्षा, नाशिकच्या न्यायालयात काय घडलं ?
गणेश सदाशिव जाधव असं 24 वर्षीय शिक्षा सूनावलेल्या आरोपीचे नाव असून सिन्नर शहरातील टिकोणी गल्ली येथे तो राहणारा आहे.
नाशिक : तब्बल सात वर्षानंतर विनयभंग केलेल्या एका नराधमाला न्यायालयाने तीन वर्षे सश्रम तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. नाशिकच्या सिन्नरमध्ये ही धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. नऊवर्षीय बलिकेला मोबाईलवर अश्लील चित्रफिती दाखवत तिचा विनयभंग केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याबाबत जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली असून तीन वर्षे सश्रम तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असून पीडितेला तब्बल सात वर्षांनी न्याय मिळाला आहे. नाशिकच्या ग्रामीण भागात घडलेल्या या घटनेनंतर नराधमाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी होऊ लागली होती. त्यावरून संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान उशिरा का होईना पीडितेला न्याय मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
गणेश सदाशिव जाधव असं 24 वर्षीय शिक्षा सूनावलेल्या आरोपीचे नाव असून सिन्नर शहरातील टिकोणी गल्ली येथे तो राहणारा आहे.
3 ऑक्टोबर 2015 ला नऊवर्षीय बालिका घरात एकटी असताना ओळखीतील असलेल्या आरोपीने घरात घुसून हे कृत्य केले होते.
नऊ वर्षीय बालिकेला आरोपीने अश्लील चित्रफिती दाखवत विनयभंग केल्याची घटना समोर आली होती त्यावरून सिन्नर पोलिसांत फिर्याद देण्यात आली होती.
फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिन्नर पोलिस ठाण्यात विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता.
सिन्नर पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरीक्षक टी. एन. आठवले यांच्याकडे याबाबतचा तपास होता त्यांनी पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.
नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायदंडाधिकारी डी. डी. देशमुख यांच्या कोर्टात हा खटला सुरू होता आज त्यावर शिक्षा सुनावण्यात आली आहे.
न्यायालयाने फिर्यादी, पंच आणि साक्षीदारांची साक्ष आणि तपास अधिकाऱ्यांनी सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून आरोपीस तीन वर्षे सश्रम तुरुंगवास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.