एकुलता एक ‘भाऊ’ आणि ‘आई’ गेली; तीन बहिणीसह आजीच्या डोळ्यातून अश्रूधारा, अपघाताने कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
38 वर्षीय वैभव कुलकर्णी आणि त्यांची 60 वर्षीय आईला सुट्टीचा दिवस असल्याने गावी घेऊन चालले होते, रस्त्या ओलंडत असतांना भरधाव वेगाने जाणाऱ्या इनोव्हा कारने त्यांना धडक दिली.
नाशिक : नाशिकच्या सिन्नर येथे इनोव्हा कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेत माय लेकाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. या अपघाताच्या मागील बाब ज्यांच्या ज्यांच्या कानावर पडली त्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाहीये. नाशिकच्या पंचवटी परिसरातील पेठरोड येथील कुलकर्णी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तीन बहीणींचा एकुलता एक भाऊ आणि आईचा अपघातात मृत्यू झाल्याने बहीणींच्या आणि आज्जीच्या डोळ्यातील अश्रूधारा कित्येक तास झाले अजूनही थांबत नाहीये. वडिलांचे दहा वर्षापूर्वी निधन झाले होते. मयत भाऊ वैभव कुलकर्णी हाच एकमेव घराचा आधार होता. त्यात एक बहीण अविवाहित होती आणि 38 वर्षीय वैभव हे देखील स्वतः अविवाहित होते. कुलकर्णी हे मूळचे सिन्नर तालुक्यातील वावी येथी रहिवाशी आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ते नाशिकमध्ये राहतात. वैभव कुलकर्णी हे एका खाजगी बँकेत वसूली विभागात काम करत होते.
38 वर्षीय वैभव कुलकर्णी आणि त्यांची 60 वर्षीय आईला सुट्टीचा दिवस असल्याने गावी घेऊन चालले होते, रस्त्या ओलंडत असतांना भरधाव वेगाने जाणाऱ्या इनोव्हा कारने त्यांना धडक दिली.
या अपघातात मुलाचा आणि आईचा जागीच मृत्यू झाला, यामध्ये दुचाकी अक्षरशः चक्काचूर झाला असून इनोव्हा कारची पुढील बाजू पूर्णतः निकामी झाली आहे.
दोघांचाही जागेवरच मृत्यू झाल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी परिसरातील उपस्थित नागरिकांनी आणि पोलीसांनी मदत केली.
मात्र, मयत वैभव कुलकर्णी यांच्या आईच्या आईला आणि बहिणींना कसे सांगायचे असा प्रश्न तेथील उपस्थितांना पडला होता, मूळचे वावीचेच कुलकर्णी असल्याने ते गावाला परिचित होते.
नाशिकमधील कुलकर्णी यांच्या परिचित असलेल्या शेजाऱ्यांना दोघांच्या अपघाताची माहिती देण्यात आली होती, त्यात ते जखमी आहे इतकेच सांगण्यात आल्याने आज्जी आणि बहिणी वावीच्या दिशेने आल्या होत्या.
मात्र, नंतर घरासमोर दोघांच्याही तिरड्यापाहून आज्जी आणि बहीणींच्या अश्रूचा बांध फुटला, घराचा आधार त्यातच एकुलता एक भाऊ कायमचा निघून गेल्यानं संपूर्ण कुटुंबालाच मोठा धक्का बसला आहे.
त्यात आज्जीचे वय 75 च्या घरात आहे, एका बहीणींचे लग्न बाकी आहे, त्यामुळे अपघाताची बातमी ज्यांच्या ज्यांच्या कानावर पडत आहे त्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येत असून हळहळ व्यक्त केली जात आहे.