ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरले आहेत. माझगाव सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा हा खटला दाखल केला होता. माझगाव कोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली होती. सत्र न्यायालयाने संजय राऊत यांना दोषी ठरवताना 15 दिवसांचा तुरुंगवास आणि 25 हजार रुपये दंड ठोठावला आहे. आयपीसीच्या कलम 500 अंतर्गत ही याचिका दाखल करण्यात आली होती. मागच्या काही महिन्यांपासून या प्रकरणी सुनावणी सुरु होती.
सत्र न्यायालयाने हा निकाल दिलाय. आता संजय राऊत या निर्णयाला वरच्या कोर्टात म्हणजे उच्च न्यायालयात आव्हान देतात का? हे लवकरच कळेल. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांची पत्नी मेधा सोमयय्यावर सार्वजनिक प्रसाधनगृहाच बांधकाम आणि देखभालीच्या कामात 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. संजय राऊत यांचे हे आरोप तथ्यहीन आणि बदनामीकारक आहेत, असं म्हणत मेधा सोमय्या यांनी त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता.
मेधा सोमय्या प्रोफेसर
या प्रकरणी त्यांनी मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. भादंवि कलम 503, 506 आणि 509 अंतर्गत ही तक्रार दाखल केली आहे. मेधा सोमय्या या शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या माटुंग्याच्या रुईया कॉलेजमध्ये ऑर्गेनिक केमिस्ट्रीच्या प्राध्यापक आहेत.
राऊंतांनी काय आरोप केलेले?
सोमय्या हे युवा प्रतिष्ठान नावाची प्रतिष्ठान चालवत होते. त्यांनी खोटी बिलं देऊन पैसे उकळले. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याची कारणं दाखवून हा घोटाळा झाला आहे. एकूण 100 कोटींचा हा घोटाळा आहे. घाण करून ठेवणारे म्हणतील पुरावे कुठे आहेत? पुरावे कुठे आहेत हेही माहिती आहे. युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्रीमती सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबाने केलेला हा घोटाळा आहे, असं राऊत म्हणाले होते.