नाशकात भर रस्त्यात मुळशी पॅटर्नचा थरार, हत्येचा थरार ऐकून अंगावर काटा येईल, पोलिसांकडून गुन्ह्याची उकल
नाशिकच्या दिंडोरी रोड येथे किरण गुंजाळ या मिरची व्यापाऱ्यावर हल्ला करत त्याची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण नाशिक शहरात खळबळ उडाली होती.
नाशिक : एकीकडे होळी सणाचा उत्सव साजरा होत असताना दुसरीकडे नाशिकच्या ( Nashik News ) दिंडोरी रोडवरील अभिषेक स्वीट्स समोर भर रस्त्यात धारधार शस्त्राने वार करत किरण गुंजाळ याची हत्या ( Nashik Murder ) करण्यात आली होती. या घटनेतील हल्लेखोरांना पोलिसांनी अवघ्या 2 तासात अटक केली आहे. मयत गुंजाळ आणि संशयित यांच्यामध्ये भाजी मार्केटमध्ये काम करत असताना त्यांच्यात किरकोळ वाद होत होते, त्यात पुन्हा एकदा सोमवारी सायंकाळी मयत गुंजाळ आणि संशयित आरोपी यांच्यात वाद झाले होते. त्यांनतर वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन संशयित आरोपी यांनी किरण गुंजाळ याच्यावर धार धार शस्त्राने वार केले होते. यात गुंजाळ याचा जागीच मृत्यू झाला होता.
दिंडोरी रोड येथे हा संपूर्ण प्रकार घडला होता. त्यांनतर आरोपींनी तेथून रिक्षाच्या साहाय्याने घटनास्थळाहुन पळ काढला. यातच पंचवटी पोलिसांनी संशयितांचा जवळजवळ तपोवन पर्यंत 7 किलोमीटर पाठलाग केला. मात्र आरोपी तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले होते.
त्यांनतर पोलिसांनी मानवी कौशल्य, आणि तांत्रिक कौशल्य वापरून सीसीटीव्हीच्या आधाराव संशयितांचा शोध घेत गुन्ह्यातील संशयित नितीन पांडुरंग साबळे, देवा उत्तम पाटील, दीपक रामन्ना वर्धे यांना अटक केली आहे. गुन्हा घडल्यापासून 2 तासात पोलिसांनी घटनेतील तिघा संशयित आरोपींना अटक केली आहे.
किरण गुंजाळ हा मिरची व्यापारी म्हणून मार्केट मध्ये असतो. काही दिवसांवर त्याच्या बहिनीचे लग्न होते. त्याच गडबडीत किरण गुंजाळ होता. सकाळच्या वेळी पत्रिका वाटून दुपारी मार्केटचे काम करत होता. त्याच वेळी हा संपूर्ण प्रकार घडला आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात गुन्हेगारीने चांगलेच डोकं वर काढले आहे. नाशिक शहरात दिवसा चोरी, खून आणि लुटीच्या घटना घडत आहे. त्यामुळे नाशिक शहरात नेमकं चाललंय काय असा सवाल उपस्थित केला जात असून पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.