17 वर्षांचा मुलगा घरात घुसला, दार लावून चाकू दाखवत महिलेला… मुंबई हादरली
मुंबईच्या मानखुर्दमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने २७ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपीने महिलेवर चाकूचा धाक दाखवून अत्याचार केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
मुंबईतील गुन्ह्यांच्या, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून त्यामुळे शहरात कायदा सुव्यवस्था आहे तरी का असा प्रश्न सध्या पडत आहे. अशीच एक धक्कादायक घटना मुंबईच्या मानखुर्द येथे घडली. तेथे अवघ्या 17 वर्षांच्या एका अल्पवयीन मुलाने घरात घुसून 27 वर्षांच्या महिलेवर अत्याचार केला. यामुळेच प्रचंड खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती मिळताच गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास करत अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असून त्याला सध्या बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. पीडित महिला ही एक गृहिणी असून ती पती व मुलांसह मानखुर्द येथे राहते. सोमवारी दुपारी ही महिला तिच्या दोन मुलांसह घराच्या दरवाजाजवळ बसली होती, तर तिचा नवरा तेव्हा कामावर गेला होता. तिच्या हालचालींवर लक्ष ठेवून असलेल्या आरोपीने तिचा पाठलाग केला आणि तो घरात घुसला, त्यानंतर त्याने दरवाजा आतून बंद केला आणि महिलेला चाकूचा धाक दाखवला. महिलेने प्रतिकार केल्यास तिला व तिच्या मुलांना जीवे मारेन अशी धमकीही त्याने दिली.
त्यानंतर त्या आरोपीने महिलेवर बळजबरी करत अत्याचार केला आणि नंतर बाहेर येऊन, दरवाजा लावून घेत घटनास्थळवारून पळ काढला. मदतीसाठी त्या महिलेने आरडाओरडा सुरू केला, ते ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेऊन दरवाजा उघडला. घडलेल्या घटनेची त्यांनी त्या महिलेच्या पतील तसेच पोलिसांनाही माहिती दिली. पीडितेच्या जबानीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय
त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला, संशयिताचा शोध घेण्यासाठी आठ पोलिस पथके तयार करण्यात आली. अल्पवयीन आरोपी हा स्थानिक रहिवासी असून घटनेपासून फरार होता. त्याने त्याचा फोन बंद ठेवला होता आणि तो घरी परत येणेही टाळत होता. अखेर पोलिसांनी रात्रभर त्याचा शोध घेतल्यानंतर मंगळवारी दुपारी त्याला अटक करण्यात आली.आरोपी अल्पवयीन आहे की नाही याची पुष्टी करण्यासाठी पोलिस त्याच्या जन्माचा दाखला आणि इतर कागदपत्रांची पडताळणी करत आहेत. वय पडताळणीच्या निकालांच्या आधारे पुढील कारवाई निश्चित केली जाईल