25 महिलांशी लग्न करणारा लखोबा… shaadi.com वर विधवा आणि नवऱ्याने सोडलेल्या महिलांना करायचा टार्गेट, अन्… वेळीच व्हा सावधान
Mumbai Crime News : सोशल मीडिया आणि ऑनलाईनमुळे आता सर्व काही लगोलग उपलब्ध होत आहे. पण या तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करणारे लफंगेही कमी नाहीत. लग्नासाठी जोडीदार पाहण्यासाठी असणाऱ्या शादी.com अॅपच्या मदतीने एकाने विधवा महिलांना टार्गेट करून पाहा काय केलं.
ऑनलाईन फसवणूकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. सर्व काही ऑनलाईन उपलब्ध झाल्यामुळे त्याचा चुकीच्या गोष्टींसाठीही वापर केला जातोय. ऑनलाईन फसवणुक करताना भावनांशी खेळत फ्रॉड केले जात असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहे. अशातच एकाने तब्बल 25 महिलांसोबत लग्न करत त्यांची आर्थिक फसवणुक केल्याचं प्रकरण समोर आलंय. लग्नाचं आमिष दाखवत आरोपीने महिलांकडून लाखो रूपयांना गंडा घातला. महिलांसोबतस ओळख करण्यासाठी आरोपी शादी डॉट कॉम अॅपचा वापर करत होता.
नेमकं काय आहे प्रकरण?
शादी डॉट कॉम या अॅपवर फिरोज नियाज शेख (वय ४३) महिलांसोबत ओळख करायचा. महिला अशा निवडायचा ज्या विधवा किंवा परितक्त्या आहेत अशांना तो हेरायचा. थोडे दिवस बोलून त्यांचा विश्वास संपादित करायचा. ओळखीचं रूपांतर हळूहळू प्रेमात करत अशा महिलांना पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करण्याची खोटी आश्वासने द्यायाचा. इतकंच नाहीतर महिलांसोबत तो लग्नही करायचा अशा त्याने आतापर्यंत 25 लग्न केली आहेत.
आरोपी फिरोज शेख याने आतापर्यंत पुणे, मुंबई, वसई विरार, उत्तर प्रदेश, गुजरात यासह अन्य राज्यातील महिलांची फसवणूक केली आहे. यामध्ये पुण्यातील 4 महिलांसोबत त्याने लग्न केल्याचं समोर आलं आहे. शादी.com अॅपसह इतर असे जे अॅप आहेत तिथे चांगल्यांना स्थळ मिळत नाहीयेत. मात्र अशा लफग्यांना मात्र महिलाही भुलल्या.
दरम्यान, लग्नाच्या बेडीत अडकलेल्या नालासोपाऱ्यातील एका महिलेने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असता हा सर्व प्रकार उघड झाला आहे. या आरोपीने 7 वर्षे तुरुंगवास ही भोगला आहे. अशी प्रकरणे वाढण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे सोशल मीडियावर कोणासोबतही बोलताना विचर करून बोला नाहीतर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे बळू पडू शकता.
लखोबा लोखंडे कोण होता?
आचार्य अत्रे यांनी ‘तो मी नव्हेच’ हे पुस्तक लिहिलं होतं. याच नावाने नाटकही बसवण्यात आलं. यामध्ये ‘लखोबा लोखंडे’ नावाचं एक पात्र होतं. या नाटकात लखोबा लोखंडे हा तंबाखू व्यापारी होता. तो महिलांना लग्नाचं आमिष दाखवून लुबाडायचा, या नाटकामधील खलनायक असलेला लखोबा लोखंडे चांगलाच प्रसिद्ध झाला होता.