Mumbai Crime : त्याला कल्पनाच नव्हती ताडीवरून झालेला वाद जीवावर बेतेल, नाहीतर…
ताडीवरून झालेला छोटासा वाद जीवावार बेतेल याची कोणालाच कल्पना नव्हती. या प्रकरणातील आरोपीला अंधेरी न्यायालयाने १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुंबई | 16 सप्टेंबर 2023 : दारू किंवा मद्य हे वाईट असते, हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे आरोग्याचे नुकसान होत असते. मात्र तरीही काहीजण मद्यपान करत असतात. मात्र हेच जीवघेणेही ठरू शकते. अशीच एक घटना मुंबईत घडली असून त्यामध्ये एका इसमाला त्याचा जीव गमवावा लागला आहे. मुंबईतील साकीनाका (sakinaka) परिसरात ताडीच्या वादातून एका तरूणाचा खून (crime news) झाला आहे. गुरूवारी दुपारी ही घटना घडली असून खुर्शीद सलाहुद्दीन शेख (वय ३६) असे मृत तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी आरोपी शेर अली छोटू अली अहमद शेख याला अटक केली आहे.
अंधेरी कोर्टाने आरोपी अलीला १७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गुरूवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास, साकीनाक्यातील ज्योती ताडीमाडी सेंटर येथे हा गुन्हा घडल्याची माहिती समोर आली आहे.
का सुरू झाला वाद ?
या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेला खुर्शीद शेख हा इसम अंधेरी-कुर्ला रोडवरील मरियमबाई चाळीत कुटुंबियांसह राहत होता. गुरूवारी दुपारी तो ज्योती ताडीमाडी सेंटरमध्ये गेला असता, ताडीच्या मुद्यावरून वाद सुरू झाला. आरोपी अली व खुर्शीद हे एकमेकांना ओळखत होते. मात्र गुरूवारी झालेल्या वादानंतर अली याने रागाच्या भरात खुर्शीद याच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्याने खुर्शीद याच्या डोक्यावर ताडीच्या बाटलीने वार केला आणि नंतर तीच बाटली त्याच्या पोटातही खुपसली. या हल्ल्यात खुर्शीद हा गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारांसाठी नजीकच्या राजावाडी रुग्णालयात नेले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच साकीनाका पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृत इसम खुर्शीद याचा मेहुणा, शाह आलम शेख यांनी नोंदवलेलल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी शेर अलीविरुद्ध आयपीसी कायद्याच्या कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला. अथक प्रयत्नांनंतर फरार आरोपी अलीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले. त्यानंतर शुक्रवारी दुपारी त्याला अंधेरी येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली