मुंबईत दिवसेंदिवस गुन्ह्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यातच आता काय गर्दीने गजबजलेल्या दादर स्थानकावरील एका घटनेमुळे मोठी खळबळ माजली आहे. स्टेशनवर जाणाऱ्या एका प्रवाशाच्या ट्रॉली बॅगमध्ये रक्ताने माखलेला मृतदेह आढळला अन् ते पाहून पोलिसांसह सर्वच हादरले. संशयावरून रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने केलेल्या तपासणीत बॅगेमध्ये हा मृतदेह सापडला होता. ही हत्या पायधुनी परिसरात घडल्यामुळे याप्रकरणाता तपास पायधुनी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. अवघ्या चार तासांच्या आत पोलिसांनी याप्रकरणाची उकल करत हत्येप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.
असा उघड झाला गुन्हा
मिळालेल्या माहितीनुसार, दादर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 11 येथे एक व्यक्ती सोमवारी सकाळी एक मोठी ट्रॉली बॅग घेऊन जात होता. मात्र ती ओढताना त्याची बरीच दमछाक होत होती, त्याला घामही फुटला होता. तेव्हा तेथे रेल्वे सुरक्षा दलाचे काही जवान गस्तीवर होते. त्यांच्यापैकी संतोषकुमार यादव यांनी त्या व्यक्तीच्या हालचाली पाहिल्या, काहीतरी काळंबेर असल्याचा संशय त्यांना आला. त्यामुळे यादव यांनी ट्रॉली बॅग ओढणाऱ्या त्या इसमाल रोखलं आणि त्याची बॅग उघडून तपासली.
बॅगेत होता रक्ताने माखलेला मृतदेह
मात्र ती बॅग उघडताच संतोषकुमार यादव चमकले. आतमध्ये एका व्यक्तीचा रक्ताने माखलेला मृतदेह होता, ते पाहून यादवही क्षणभरासाठी दचकले. तो मृतदेह बॅगेत कसातरी कोंबून बसवला होता. यादव यांनी याची माहिती लगेच त्यांच्या सहकारी जवानांना दिली आणि त्या बॅग घेऊन जाणाऱ्या त्या व्यक्तीला आणि मृतदेह असलेली ती बॅग ताब्यात घेतली.
अधिक चौकशी केली असता तो मृतदेह अर्शद अली सादीक अली शेख (वय 30) याचा असल्याचे स्पष्ट झाले. शेख हा सांताक्रुझ कलिना परिसरातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर दादर रेल्वे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत मृतदेह घेऊन जाणारा जय प्रवीण चावडा याला ताब्यात घेण्यात आले.
दोघांना अटक
त्याच्या चौकशीत केली असता अधिक माहिती समोर आली. आणखी एका तरूणाचे नावही या हत्याप्रकरणात समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवजीत कुमार सिंह याने त्याचा मित्र जय चावडा याच्या मदतीने शेख याची हत्या केली. त्यानंतर कोकणामध्ये जाऊन शेख याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा त्यांचा प्लान होता, त्यानुसार दोघांनी शेखचा मृतदेह बॅगेत कोंबला आणि ते एक्स्प्रेसने कोकणात जात होते. मात्र ट्रेनमध्ये चढण्यापूर्वीच पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्यांना पकडले आणि गुन्हा उघडकीस आला.
शिवजित सिंह आणि जय चावडा या दोघांनी मिळून अर्शद अली शेख याची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समजले. शिवजित सिंह घटनास्थळावरुन पळून गेला होता. मात्र, जय चावडा याच्याकडून माहिती मिळाल्यावर पोलिसांनी शिवजित सिंह याला उल्हासनगरमधून अटक केली. तसेच गुन्ह्यासाठी वापरलेले हत्यारही पोलिसांनी जप्त केले आहे