मुंबईतील पाणी कपात महिलेच्या जीवावर बेतली, नवऱ्याला अंघोळीला विरोध करताच चाकूने… काय घडलं साकीनाक्यात ?
पावसाळा तोंडावर आला तरी राज्यासह मुंबईतही सध्या पाणीकपातीचं संकट घोंघावत आहे. मुंबईतील अनेक ठिकाणी सध्या पाणीकपात सुरू हेच कारण एका महिलेच्या जीवावर बेतलं. पाणी संकटामुळे मुंबईत एक धक्कादायक घटना घडली असून एका महिलेचा जीव जाता जाता राहिला.
पावसाळा तोंडावर आला तरी राज्यासह मुंबईतही सध्या पाणीकपातीचं संकट घोंघावत आहे. मुंबईतील अनेक ठिकाणी सध्या पाणीकपात सुरू हेच कारण एका महिलेच्या जीवावर बेतलं. पाणी संकटामुळे मुंबईत एक धक्कादायक घटना घडली असून एका महिलेचा जीव जाता जाता राहिला. पाणी कपातीमुळे पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली असून यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी आरोपी पती परमात्मा गुप्ता (वय 42) याला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या निर्घृण हल्ल्यामध्ये मीरा गुप्ता नावाची महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
नवऱ्याला अंघोळीला विरोध केला अन्
मुंबईत सध्या अनेक ठिकाणी पाणीकपात सुरू आहे. सर्वांच्याच घरात पाण्याचे वांदे होत आहेत, मात्र तेच कारण एका महिलेच्या जीवासाठी घातक ठरले. पालिकेने पाणीकपात केल्याने मीरा गुप्ता यांच्या घरातही पाणी कमी होते. शनिवारी दुपारी त्यांचे पती परमात्मा गुप्ता (वय 42) हे घरी आले. त्यांना अंघोळीला जायचं होतं. मात्र पालिकेने पाणीकपात केल्याने तसेच घरात पाणी कमी असल्याने पत्नी मीरा यांनी त्यांना अंघोळ करू नका असे सांगत विरोध दर्शवला. मात्र यामुळे परमात्मा गुप्ता संतापले आणि त्यांनी पत्नीवर हल्ला केला. स्वयंपाक घरातील कांदा चिरण्याचा चाकू घेऊन त्यांनी मीरा यांच्या पोटा सपासप तीन वार केले. यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. या घटनेची माहिती मिळताच साकीनाका पोलिस घटनास्थलू पोहोचले आणि त्यांनी परमात्मा गुप्ता यांना अटक केली. त्यांच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
वाढदिवसाला केक उशिरा आणला म्हणून पतीचा पत्नी आणि मुलावर चाकू हल्ला
दरम्यान मुंबईत आणखी एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. वाढदिवसाला केक उशिरा आणला म्हणून पतीने त्याची पत्नी आणि मुलावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यानंतर आरोपी पती राजेंद्र शिंदे फरार झाले असून साकीनाका पोलिस स्टेशनमध्ये हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाढदिवसाला केक उशीरा आणला म्हणून आरोपी राजेंद्र शिंदे संतापले. त्यांनी त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्यावर हल्ला चढवला. पत्नीच्या मनगटावर तर मुलाच्या पोटात आणि छातीत चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून दोघांवरही राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर आरोपी राजेंद्र शिंदे फरार असून साकानीका पोलिस त्याचा शोध घेत आहेत.