भाडं नाकारल्याचा राग, दादर मार्केटजवळ प्रवाशाने टॅक्सी चालकाला पेव्हर ब्लॉक्सने ठेचलं
54 वर्षीय टॅक्सी चालक छबिराज जैस्वार यांनी भाडे नाकारल्यावरुन प्रवाशासोबत त्याचा वाद झाल्याचं पोलिसांनी सांगितलं (Mumbai Murder of Taxi Driver )
मुंबई : भाडं नाकारल्याच्या रागातून प्रवाशाने टॅक्सी चालकाची हत्या केल्याची घटना मुंबईत उघडकीस आली आहे. दादर मार्केट परिसरात रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या 30 वर्षीय प्रवाशाने टॅक्सी चालकाचा चेहरा तीन पेव्हर ब्लॉक्सने ठेचला. 54 वर्षीय टॅक्सी चालकाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी प्रवाशाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. (Mumbai Crime News Man held for Murder of Taxi Driver at Dadar Market for refusing ride)
30 वर्षीय आरोपी बसवराज मेलिनमानी हा मूळ कर्नाटकातील विजयनगरचा रहिवासी आहे. सध्या तो दादरमधील सेनापती बापट मार्गावर आंबेडकर नगर भागात राहतो. दादर मार्केट परिसरातच त्याने मद्यपान केले. त्यानंतर संबंधित टॅक्सी चालकाला त्याने आपल्या घरी सोडण्यास सांगितलं.
भाडे नाकारल्याने वाद
दादर मार्केट ते आंबेडकर नगर हे कमी अंतर असल्यामुळे 54 वर्षीय टॅक्सी चालक छबिराज जैस्वार यांनी भाडे नाकारले. यावरुन दोघांमध्ये प्रचंड वाद झाला. जैस्वार यांनी आरोपीला शिवीगाळ केल्याचंही पोलिसांनी सांगितलं. वादावादीत टॅक्सी चालक फूटपाथवर पडला. या संधीचा फायदा घेत बसवराजने जवळ पडलेले तीन पेव्हर ब्लॉक्स उचलले आणि जैस्वार यांचं तोंड ठेचलं.
टॅक्सी चालकाचा जागीच मृत्यू
आरोपी बसवराज मेलिनमानी याने घटनास्थळावरुन पोबारा केला. पहाटे 6.15 वाजताच्या सुमारास स्थानिक रहिवाशांनी छबिराज जैस्वार यांना रस्त्यावर पडलेलं पाहिलं. त्यांनी तातडीने पोलीस कंट्रोल रुमला याविषयी माहिती दिली. त्यानंतर दादर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी टॅक्सी चालकाला सायन रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित केले. मयत टॅक्सी चालक मानखुर्द भागात कुटुंबासोबत राहत होता.
सीसीटीव्ही फूटेजने आरोपीचा शोध
पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. दादर मार्केट परिसरातील काही दुकानं आणि मंदिरातील सीसीटीव्ही फूटेज पाहिल्यावर पोलिसांना घटनेचा उलगडा झाला. पिवळ्या रंगाचा टीशर्ट घातलेल्या बारीक तरुणाची ओळख पटली. घटनास्थळापासून जेमतेम 200 मीटर अंतरावर आरोपी राहत असल्याचं पोलिसांना समजलं. पोलिसांनी ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी कामगार असून दादर आणि वरळी परिसरातील वेगवेगळ्या दुकानदारांकडे तो काम करतो, असं पोलिसांच्या तपासात पुढे आलं.
संबंधित बातम्या :
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड
(Mumbai Crime News Man held for Murder of Taxi Driver at Dadar Market for refusing ride)