Best Condustor Beating : बेस्ट बसच्या कंडक्टरला मारहाण करणे प्रवाशाला महागात पडले; कोर्टाने सुनावली सहा महिन्यांची शिक्षा
दहा वर्षांपूर्वी जुलै 2013 मध्ये ही घटना घडली होती. बसच्या मागच्या दरवाज्यातून उतरताना एका प्रवाशाला बस कंडक्टरने अडवले होते. या रागातून प्रवाशाने बस कंडक्टरवर हात उगारत गंभीर मारहाण केली होती.
मुंबई : बसच्या प्रवासात कंडक्टर-चालकाशी हुज्जत घालण्याचे प्रकार अनेकदा घडतात. सुरुवातीला बाचाबाची होऊन नंतर हा वाद हातघाईवरही येतो. अशाच एका घटनेत कंडक्टरला एका प्रवाशाने मारहाण (Beating) केली होती. त्यात त्या कंडक्टरला गंभीर दुखापत झाली होती. या गुन्ह्याचे गंभीर स्वरुपात विचारात घेऊन मुंबईतील एका कनिष्ठ न्यायालया (Lower Court)ने नुकताच या घटनेत निकाल दिला आहे. न्यायालयाने सरकारी पक्षाकडून सादर करण्यात आलेल्या ठोस पुराव्यांची दखल घेत आरोपी प्रवाशाला सहा महिन्यांच्या कारावासा (Imprisonment)ची शिक्षा आणि 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची ही रक्कम बस कंडक्टरला भरपाई म्हणून दिली जाणार आहे.
काय आहे प्रकरण ?
दहा वर्षांपूर्वी जुलै 2013 मध्ये ही घटना घडली होती. बसच्या मागच्या दरवाज्यातून उतरताना एका प्रवाशाला बस कंडक्टरने अडवले होते. या रागातून प्रवाशाने बस कंडक्टरवर हात उगारत गंभीर मारहाण केली होती. या प्रकरणाची कनिष्ठ न्यायालयात सुनावणी सुरु होती. सरकारी पक्ष आणि बचाव पक्ष यांचा युक्तीवाद आज न्यायालयात झाला. युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर उपलब्ध साक्षी-पुराव्यांच्या आधारे कनिष्ठ न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. घटना घडली तेव्हा आरोपी 23 वर्षांचा होता. सध्या तो विवाहित असून त्याला दोन मुलेही आहेत. ही वस्तुस्थितीही कनिष्ठ न्यायालयाने निकाल देताना विचारात घेतली.
ठोस पुराव्यांच्या आधारे आरोपीला कारावासाची शिक्षा
पंकज आगवणे हे कंडक्टर 23 जुलै 2013 रोजी आपली ड्युटी बजावत होते. यावेळी पंकज आगवणे यांनी नेहमीप्रमाणे सर्व प्रवाशांना बसच्या पुढील दरवाजातून उतरण्यास सांगितले. मात्र आरोपीने त्यांचे न ऐकता मागच्याच दरवाजातून उतरण्याचा प्रयत्न केला. यावेळी आगवणे यांनी त्याला अडवले असता आरोपीने त्यांना मारहाण केली. त्यात आगवणेंना दुखापत झाली होती. याप्रकरणी शाहू नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात सरकारी पक्षाने बस कंडक्टरला झालेल्या मारहाणीचे ठोस पुरावे सादर केले. त्या पुराव्यांची दखल घेत सत्र न्यायाधीश एस. डी. तावशीकर यांनी नुकताच या प्रकरणात निकाल दिला आहे. आरोपीने कंडक्टरवर हल्ला केल्याचे आणि सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याचे पुराव्यांवरून सिद्ध झाले. यामुळे गुन्ह्याचे गंभीर स्वरुप लक्षात घेता आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, असे मत व्यक्त करीत सत्र न्यायाधीश तावशीकर यांनी निकाल दिला. (A passenger who assaulted the conductor of Best Bus was sentenced to six months imprisonment)