मुंबई : चर्चगेट येथील गरवारे क्लबमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. सर्वजण रविवारी फिफा वर्ल्ड कप पाहण्यात दंग होते. अचानक एक अशी घटना घडली की क्लबमधील उत्साहाचे शोकात रुपांतर झाले. आई-वडिलांसोबत फिफा वर्ल्ड कप पाहण्यासाठी आलेल्या एका तीन वर्षीय बालकाचा पाचव्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. पाचव्या मजल्यावरुन पडल्याने मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तात्काळ बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आयसीयूत दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
परेल येथील राठोड कुटुंबीय रविवारी चर्चगेट येथील गरवारे क्लबमध्ये सहाव्या मजल्यावरील छतावर फिफा वर्ल्ड कप पहायला गेले होते. आई-वडिल फिफा वर्ल्ड कप पाहण्यात दंग होते. यावेळी रात्री 11 च्या सुमारास तीन मुलगा आपल्या 11 वर्षाच्या भावासोबत पाचव्या मजल्यावर बाथरुममध्ये गेला होता.
बाथरुमला जाऊन आल्यानंतर दोघे भाऊ सहाव्या मजल्यावर परतत होते. मोठ मुलगा पुढे चालत होता तर तीन वर्षाच्या चिमुकला त्याच्या मागे चालत होता. जिना चढत असताना अचानक आवाज आला म्हणून मोठ्या मुलाने मागे वळून पाहिले तर छोटा मुलगा जिन्यातून खाली पडला होता. त्यानंतर धावत जाऊन आई-वडिलांना याची माहिती दिली.
ज्या जिन्यावरून मुलगा पडला त्या जिन्यावर काचेचे स्लॅब आणि स्टीलचे रेलिंग होते. मूल जिथून घसरले होते तिथून काचेचा स्लॅब गायब होता. यामुळे तिथे मोठा गॅप पडला होता. यावरुन क्लबचा निष्काळजीपणा अधोरेखित होत आहे.
मोठा आवाज झाला म्हणून तळमजल्यावरील वाचमनने धावत येऊन पाहिले असता मुलगा जमिनीवर पडलेला आढळला. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. नातेवाईक आणि पोलिसांनी तात्काळ त्याला बॉम्बे रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयात पोहचताच मुलाचा मृत्यू झाला.
जीटी रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मुलाचा मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला. याप्रकरणी मरिन लाईन्स पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, क्लबचा वॉचमन आणि मयत मुलाचा 11 वर्षाचा भाऊ यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.