सेल्फी काढण्यासाठी तरुण ट्रेनच्या छतावर चढला; मात्र हा मोह महागात पडला, कारण…
रेल्वे पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तो सेल्फीसाठी ट्रेनच्या छतावर चढला होता. या घटनेने रेल्वेच्या आवारातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मुंबई : मुंबईच्या उपनगरी लोकल प्रवासात जीवघेणे स्टंट (Stunt) करण्याचे प्रकार सुरूच आहेत. सोमवारी सकाळी पश्चिम रेल्वे मार्गावरील जोगेश्वरी स्थानकात असाच एक प्रकार घडला. जोगेश्वरी रेल्वे यार्ड येथे उभ्या असलेल्या ट्रेनच्या ओव्हरहेड वायर (Overhead Wire)ला स्पर्श झाल्याने 20 वर्षीय तरुण गंभीर भाजला (Burn) आहे. रेल्वे पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तो सेल्फीसाठी ट्रेनच्या छतावर चढला होता. या घटनेने रेल्वेच्या आवारातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
रेल्वे यार्डमध्ये तरुण घुसलाच कसा?
ओव्हरहेड वायरचा स्पर्श होऊन तरुण तब्बल 80 टक्के भाजला आहे. त्यामुळे त्याच्या जीवाला गंभीर धोका असल्याचे बोलले जात आहे. सोमवारी सकाळी 9 वाजून 55 मिनिटांच्या सुमारास तो ट्रेनच्या छतावर चढला होता.
ती ट्रेन दुपारी वांद्रे टर्मिनसला जाण्यासाठी यार्डातून निघते. तो तरुण यार्डमध्ये घुसलाच कसा? याची सध्या चर्चा सुरु आहे.
रेल्वे स्टेशनच्या बाहेरील दुकानात काम करणारा तरुण
अमन शेख असे गंभीर भाजलेल्या तरुणाचे नाव आहे. तो जोगेश्वरी रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडील परिसरातील एका दुकानात लोडिंग-अनलोडिंग एजंट म्हणून काम करतो.
सोमवारी पहाटे साडेपाच वाजता शेख ड्युटीवर हजर झाला होता. त्यानंतर तो मधेच रेल्वे यार्डकडे वळला होता.
तो सेल्फी घेण्यासाठी ट्रेनच्या छतावर चढला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत अधिक चौकशी सुरु आहे, असे बोरिवली जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल कदम यांनी सांगितले.
यार्डातील पॉइंट मॅनला ऐकू आला मोठा आवाज
जोगेश्वरी रेल्वे यार्डातील पॉइंट मॅनला सकाळी 9.55 च्या सुमारास ट्रेनच्या छतावर कसला तरी स्फोट झाल्याचा मोठा आवाज ऐकू आला. त्यामुळे पॉइंट मॅन तातडीने राम मंदिर आणि जोगेश्वरी स्थानकादरम्यानच्या रुळांच्या दिशेने गेला, तेव्हा त्याला तरुण भाजलेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेला दिसला.
शेख यार्डात का गेला किंवा ट्रेनच्या छतावर का चढला हे नेमके समजू शकलेले नाही. मात्र हातात मोबाईल होता. त्यामुळे सेल्फी घेण्यासाठी गेला असण्याची दाट शक्यता आहे.
परिसरात कुठेही सीसीटीव्ही नाहीत
शेखला उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. सिमेंट घेऊन जाणाऱ्या बोगी जोगेश्वरी रेल्वे यार्डमध्ये उतरवल्या जातात आणि तेथे नेहमीच मजूर असतात. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
परिसरात कुठेही सीसीटीव्ही नाहीत. शेख यार्डात कसा आला आणि तो ट्रेनच्या छतावर का चढला, याचा शोध घेण्याचा प्रयत्न रेल्वे पोलीस करीत आहेत.