किड्स झोनचा आनंद बेतला जीवावर, पालकांसमोरच चिमुकलीने सोडले प्राण
घटना घडली तेव्हा पालक मुलीच्या सोबतच होते. पालकांनी कुणाबाबत तक्रार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे याप्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात अपघाताची मृत्यूची नोंद केली आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसात विविध मॉलच्या किड्स झोनमध्ये मुलांना खेळण्यासाठी नेण्याकडे पालकांबरोबर विविध शाळांचा कल वाढत आहे. मात्र, कधी कधी हे किड्स झोन संकटाचे कारणही ठरु शकतात हे घाटकोपरमधील घटनेवरुन सिद्ध झाले आहे. किड्स झोनमध्ये घसरगुंडी खेळत असताना तोल जाऊन खाली पडल्याने 3 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची काळाजाचा ठोका चुकवणारी घटना घाटकोपरमध्ये घडली आहे. यामुळे तुम्हीही मुलांना किड्स झोनमध्ये खेळायला नेत असल्यास काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
रविवारी सुट्टी असल्याने किड झोनमध्ये खेळण्यास गेले होते
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिळकनगर परिसरात 3 वर्षाची चिमुकली आई वडिलांसोबत राहण्यास होती. रविवारी सुट्टी निमित्त आई-वडिल मुलीला खेळण्यासाठी घाटकोपर पूर्वेकडील नीलयोग मॉल येथील किड्स झोनमध्ये घेऊन गेले. तेथे घसरगुंडीचा आनंद लुटत असताना तोल जाऊन चिमुकली खाली पडली.
मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने मुलीचा मृत्यू
खाली पडल्याने मुलीच्या डोक्याला मार बसल्याने ती बेशुद्ध पडली. या घटनेने मॉलमध्येही खळबळ उडाली. तिला तात्काळ घाटकोपरच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले.
मुलीचे सीटी स्कॅन केले असता मुलीच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचारासाठी मुलुंडच्या रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास तिला मृत घोषित करण्यात आले. या घटनेने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अपघाताची मृत्यूची नोंद
घटना घडली तेव्हा पालक मुलीच्या सोबतच होते. पालकांनी कुणाबाबत तक्रार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे याप्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात अपघाताची मृत्यूची नोंद केली आहे.