मुंबई / गोविंद ठाकूर (प्रतिनिधी) : चैन स्नॅचिंग करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला पकडण्यास बोरीवली एमएचबी पोलिसांना यश आले आहे. कल्याणमधील कुप्रसिद्ध इराणी वस्तीतून पोलिसांनी विशेष पथक बनवून या चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. या चोरट्यावर 30 हून अधिक चैन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत. आरोपीला पकडण्यासाठी झोन 11 चे डीसीपी अजयकुमार बन्सल आणि MHB चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी 26 जणांची विशेष टीम तयार केली होती. ज्यामध्ये 26 पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी योजना आखली. या पथकाचे नेतृत्व सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यकांत पवार करत होते. पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी पोलीस व्हॅनऐवजी अॅम्ब्युलन्स आणि रिक्षाचा वापर केला.
एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या होत्या. चैन स्नॅचिंगचा आरोपी हा आंबिवली इराणी वस्ती कल्याण येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
आंबिवलीमधील इराणी वस्ती ही फार पूर्वीपासून चोरांची वस्ती म्हणून कुप्रसिद्ध आहे. या इराणी वस्तीमध्ये पोलिसांनी आरोपीस अटक करण्याचा प्रयत्न केल्यास वस्तीवरील सर्व महिला एकत्र येऊन पोलिसांना घोळका घालून त्यांना दगडफेक करतात.
गावामध्ये प्रवेश करण्यासाठी एक नदी आहे, त्या नदीवरून जाणारा ब्रिज आहे. गावामध्ये येण्यासाठी हा एकच ब्रिज असल्यामुळे या इराणी लोकांना पोलिसांची खबर लगेचच मिळते आणि हे आरोपी सतर्क होतात.
या वस्तीतून आरोपीला उचलणे हे खूप मोठे, अवघड आणि खूप जोखमीचे काम होते. ही जोखीम उचलण्यासाठी एकाच पोलीस ठाण्याची टीम पुरेशी नव्हती. त्यामुळे हे मिशन पूर्ण करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यकांत पवार यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ 11 यांच्याकडे अतिरिक्त कुमक देण्याची विनंती केली.
त्यानुसार पोलीस उपायुक्त परिमंडळ 11 यांनी परवानगी दिल्यानंतर तात्काळ परिमंडळ-11 अंतर्गत येणाऱ्या चारकोप पोलीस ठाणे, बोरीवली पोलीस ठाणे आणि मालाड पोलीस ठाणे यांच्या गुन्हे प्रकटीकरण अधिकारी आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाकडे मदत मागितली.
या कारवाईसाठी पोलिसांची 26 जणांची विशेष टीम तसेच 2 अॅम्बुलन्स चालक, 3 कांदिवली पोलीस मित्र सज्ज झाले. आंबिवली गावात जाण्यासाठी दोन ॲम्बुलन्स आणि दोन प्रायव्हेट गाड्यांचा वापर करण्यात आला.
तसेच धोकादायक परिस्थिती उद्भवल्यास सोबत पिस्टल, लाठ्या ठेवण्यात आले होते. गावाच्या बाहेर पोहोचल्यावर 26 लोक चार वाहने, 3 टीममध्ये विभाजन केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार आणि पथक, पोलीस उपनिरीक्षक अखिलेश बोंबे आणि पथक, सहाय्यक पोलीस निरीक्षक टोके आणि पथक अशी तीन पथके तयार करण्यात आली.
गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार सदर आरोपी हा पांढऱ्या रंगाचा शर्ट घालून चहाच्या टपरीवर बसला होता. पवार साहेबांच्या कॉलवर तिन्ही टीम रवाना झाल्या. एका टीमने ॲम्बुलन्समधून इराणी वस्तीमध्ये प्रवेश करताच आरोपीला कुणकुण लागली.
आरोपीने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी शिताफीने प्लाननुसार आरोपीवर झडप घालत त्याच्या मुसक्या आवळल्या. यावेळी वस्तीतील लोकांनी पूर्ण टीमला घेरले आणि दगड फेकण्यास सुरुवात केली. मात्र पोलिसांनीही लाठीहल्ला करत जमावाला पांगवले आणि आरोपीला घेऊन तेथून पळ काढला.