कल्याणमध्ये शाळेच्या मालकी हक्कासाठी थेट प्रशासकाची सुपारी, भर रस्त्यावर रक्तपाताचा प्रयत्न, भयानक थरार
शाळेच्या मालकी हक्काच्या वादातून एका शाळेच्या प्रशासकाची सुपारी दिल्याची बाब समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे शाळेच्या कर्मचाऱ्यानेच ही सुपारी घेतल्याचे उघड झालं आहे.
कल्याण (ठाणे) : शाळेच्या मालकी हक्काच्या वादातून एका शाळेच्या प्रशासकाची सुपारी दिल्याची बाब समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे शाळेच्या कर्मचाऱ्यानेच ही सुपारी घेतल्याचे उघड झालं आहे. याप्रकरणी कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तर सुपारी कोणी दिली होती? याचा तपास पोलीस करत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
कल्याण पूर्व भागातील काटेमानिवली परिसरात साई इंग्लीश स्कूल ही नामांकीत शाळा आहे. या शाळेच्या मालकी हक्कावरुन शाळेचे प्रशासक गिरीबाबू सोमया जुला यांचा दुसऱ्या एका महिलेसोबत वाद सुरु आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. 14 ऑक्टोबर रोजी गिरीबाबू आपल्या पत्नी आणि दोन मुलांसोबत स्वताच्या गाडीने कल्याण पश्चिमेतून कल्याण पूर्व भागातील शाळेकडे निघाले होते. या दरम्यान काही लोकांनी एका ठिकाणी रस्त्यावर त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला.
घटना सीसीटीव्हीत कैद
गिरीबाबू यांना सुरुवातीला वाटले की, गाडीला काही धक्का लागला असेल, म्हणून ते गाडी थांबवित आहेत. नंतर त्यांनी पाहिले की, गाडी थांबविणाऱ्या व्यक्तीच्या हाती रॉड आणि कोयता आहे. त्यांच्या लक्षात आले की, हे लोक त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी आले आहेत. एका गाडीवर दोन तर दुसऱ्या गाडीवर तीन असे एकूण पाच हल्लेखोर होते. यावेळी स्कूटी चालकाने त्याची स्कूटी गिरीबाबू यांच्या गाडीसमोर आणून ठेवली. गिरीबाबू यांनी गाडी न थांबविता स्कूटी फरफटत नेली. त्याच्यामागे चार ते पाच हल्लेखोर होते. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. कल्याणच्या खडकापाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दोन हल्लेखोरांना पकडलं
अॅडीशनल सीपी दत्तात्रय कराळे, डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी उमेश माने पाटील यांच्या मागदर्शनाखाली खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक पवार आणि पीआय शरद झीने त्यांनी तपास सुरु केला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने या प्रकरणाचा छडा लावला. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. जयेश अंकूश आणि राहूल खुळे अशी दोन आरोपींची नावे आहेत.
गिरीबाबू यांना शाळेतून हटविण्यासाठी हा कट
धक्कादायक म्हणजे जयेश हा साई स्कूल शाळेत काम करतो. गिरीबाबू सोबत शाळेच्या मालकी हक्कावरुन एका महिलेसोबत वाद सुरु आहे. या वादात गिरीबाबू यांना शाळेतून हटविण्यासाठी हा कट रचला गेला. जयेशला गिरीबाबू यांच्यावर हल्ला करण्यासाठी कोणी सुपारी दिली होती, याचा तपास पोलीस करीत आहे. या प्रकरणी पोलीस अजून सात आरोपींचा शोध घेत आहेत.
हेही वाचा :
के पी गोसावीला शोधण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचं सर्च ऑपरेशन, त्याचं शेवटचं लोकेशन आगरतळा