त्याने मुलीच्या बॅगवर चिठ्ठी ठेवली आणि थेट पोलिसांकडूनच फोन आला! कारण काय?
वेळ दुपारची, 15 वर्षांची मुलगी ट्युशन क्लासवरुन घरी येत होती, तेव्हा नेमकं काय घडलं?
मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी परिसरात एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी दोन तरुणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय. पीडित मुलगी ही 15 वर्षांची आहे. ही मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत ट्युशन क्लास संपवून घरी जात असताना सदर घटना घडली. आंबोली पोलिसांनी याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे. सध्या दुसऱ्या आरोपीचा अद्याप शोध घेतला जात आहे.
आरोपी सलमान कुरेशी याला या विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. 26 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास पीडित मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत ट्युशन क्लास संपवून घरी जात होती. त्यावेळी समोरून येणाऱ्या मर्सिडीज कारमध्ये आरोपी सलमान कुरेशी आणि त्याच्या मित्राने पीडिता आणि तिच्यासोबतच्या मुलीला हाताने इशारा केला.
या प्रकारानंतर दोन्ही मुली घाबरून ऑटोरिक्षात बसल्या आणि घरी जाऊ लागल्या. मात्र आरोपींनी त्या रिक्षाचा पाठलाग करून गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, असं पीडितेच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलंय.
अटक करण्यात आलेला आरोपी सलमान कुरेशीने ऑटोरिक्षा अडवून पीडित मुलीच्या बॅगवर एक चिठ्ठी ठेवली आणि तो निघून गेला. त्या चिठ्ठीत एक मोबाईल क्रमांक असल्याचे पीडितेनं पाहिलं. यानंतर तिने याबाबतची माहिती तिच्या वडिलांना दिली. वडिलांनी तीच चिठ्ठी घेऊन सरळ आंबोली पोलीस ठाणे गाठले आणि फिर्याद दिली.
आंबोली पोलिसांनी आरोपी सलमान कुरेशी आणि त्याच्या मित्रावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय. पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या चिठ्ठीत असलेल्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे लोकेशनही पोलिसांनी ट्रेस केलं. अखेर आरोपी सलमान कुरेशी याला अटक करण्याथ आलीय.
गुन्हा घडला त्यावेळी आरोपी ज्या मर्सिडीज गाडीत होता, ती मर्सिडीज गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतलीय. सलमान कुरेशीच्या सोबत असणाऱ्या त्याच्या मित्राचा सध्या शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. या प्रकरणी पुढील तपास केला जातोय.