अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरण; बुकी अनिल जयसिंघांनी याला अखेर अटक; पोलिसांची मोठी कारवाई
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी बुकी अनिल जयसिंघानी याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने त्याला गुजरातमधून अटक केली आहे.
मुंबई : अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी अखेर बुकी अनिल जयसिंघानी याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने जयसिंघानी याला अटक केली आहे. त्याला गुजरातमधून ताब्यात घेण्यात आले आहे. जयसिंघानी याला अटक केल्याने आता या प्रकरणातील अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. जयसिंघानी यांची मुलगी अनिक्षा हिला आधीच पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यानंतरची ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे.
अनिल जयसिंघानी आणि त्याची मुलगी अनिक्षा हिने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. अमृता यांना एक कोटी रुपयांच्या लाचेचीही ऑफर दिली होती. तसेच त्यांना टेक्स्ट मेसेज, व्हिडीओ पाठवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी अनिक्षा आणि अनिल जयसिंघानी विरोधात मलबारहिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी उल्हानगरला जाऊन अनिक्षा हिला अटक केली होती.
कोर्टात हजर करणार
त्यानंतर पोलिसांनी अनिल जयसिंघानी याला पकडण्यासाठी एक पथक तयार केलं होतं. हे पथक गुजरातलं गेलं आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने त्याला ताब्यात घेतलं. अटक केल्यानंतर जयसिंघानी याला आता मुंबईत आणल्या जात आहे. त्याला उद्या कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे. तसेच अनिल आणि अनिक्षा या दोघांनाही समोरासमोर बसवून त्यांची चौकशी केली जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
दूध का दूध पानी का पानी होईल
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच अनिल जयसिंघानी याने टीव्ही9 मराठीशी संवाद साधत धक्कादायक विधान केलं होतं. माझ्या मुलीवर बोगस केस केलं आहे. मी काहीही बोललो तर विनाकारण माझ्या मुलीला पोलीस कोठडीत टॉर्चर केलं जाईल. पोलीस कोठडीतून बाहेर येऊ द्या. दूध का दूध पानी का पानी होईल. माझी तब्येत ठिक नाही. मी वयस्क आहे. माझी तब्येत बरी नाही. मी संध्याकाळी या प्रकरणावर सविस्तर बोलेल. आमच्यावर अन्याय होत आहे, असं जयसिंघानी म्हणाला होता.