हॉटेलच्या पार्किंगमध्ये दुचाकी उभी केली, नंतर बघितलं तर गाडीच गायब, उल्हासनगरातील धक्कादायक घटना
लॉकडाऊन काळात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. उल्हासनगरमध्ये तर हॉटेलच्या पार्किंगमधूनच दुचाकी चोरी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
उल्हासनगर (ठाणे) : लॉकडाऊन काळात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. उल्हासनगरमध्ये तर हॉटेलच्या पार्किंगमधूनच दुचाकी चोरी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे संबंधित परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत. तरीही चोरट्याने पार्किंगमधील दुचाकी चोरी केल्याचं धाडस केलं आहे. दुचाकी चोरीची ही घटना सीसीटीव्ही अचूकपणे कैद झाली आहे.
नेमकं काय घडलं?
उल्हासनगरच्या कॅम्प 3 मध्ये मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत सेंट्रल पार्क नावाचं हॉटेल आहे. या हॉटेलच्या पार्किंगमध्ये बाळकृष्ण गुप्ता यांनी रविवारी (25 जुलै) मध्यरात्री आपली बजाज पल्सर 220 ही दुचाकी पार्क केली होती. यानंतर रविवारी दुपारी त्यांनी दुचाकी शोधली असता दुचाकी तिथे नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
यानंतर त्यांनी पार्किंगचे सीसीटीव्ही तपासले असता अज्ञात चोरट्याने रात्रीच्या वेळी ही दुचाकी चोरून नेल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. यांनतर त्यांच्या तक्रारीनुसार मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस पुढील तपास करत आहेत.
कल्याण पूर्वेतही वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ
राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या दुचाकी चोरीच्या घटनांध्ये वाढ झाली आहे. उल्हासनगर नजीक असलेल्या कल्याण पूर्वेतही गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सर्वसामान्य नागरिक प्रचंड मेहनत करुन एखादी गाडी विकत घेतो. या गाड्या अशा रात्री-अपरात्री चोरीला गेल्या तर त्यांनी नेमकं काय करावं? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. विशेष म्हणजे पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलीस फक्त तपास सुरु असल्याचं सांगतात, असाही काही नागरिकांचा अनुभव आहे.
हेही वाचा :
अब्जावधींचा रिव्हेन्यू, कोट्यवधींचा नफा, राज कुंद्राच्या कंपनीला भविष्यात तब्बल इतका फायदा?
भाईगिरीची हौस, खोटी बंदूक घेऊन सोशल मीडियावर फोटो शेअर, पोलिसांनी पकडताच पितळ उघडं