मृत भावाच्या नावावर महापालिकेत 6 वर्ष नोकरी, मुंबईत सुरक्षारक्षकाविरोधात तक्रार
दिनेश पेरे याचा मृत्यू 2009 मध्ये झाला असून मंगेश पेरेने खोटी कागदपत्रे जोडून नोकरी मिळवल्याचं समोर आलं. 11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या भावाच्या नावाचा आणि बनावट कागदपत्रांचा वापर करुन मंगेशने पालिकेत सुरक्षारक्षक म्हणून नोकरी केल्याचं उघडकीस आलं.
मुंबई : मृत भावाच्या नावावर महापालिकेत 6 वर्ष नोकरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या भावाच्या नावाचा आणि बनावट कागदपत्रांचा वापर करुन आरोपीने पालिकेत सुरक्षारक्षक म्हणून नोकरी केली. बुलडाणा पोलीस संबंधित व्यक्तीला एका प्रकरणात ताब्यात घेण्यासाठी गेले असताना हा प्रकार समोर आला.
काय आहे प्रकरण?
2014 मध्ये दिनेश पेरे याची निवड भांडुप संकुल येथे सुरक्षा रक्षक म्हणून झाली. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात एका प्रकरणात बुलडाणा पोलिसांनी त्याची चौकशी सुरु केली, तेव्हा तो गायब झाला. त्यावेळी पालिकेने पोलिसांकडे चौकशी करताच तो दिनेश नसून मंगेश पेरे असल्याचं उघड झालं.
मृत भावाच्या नावाचा गैरवापर
दिनेश पेरे याचा मृत्यू 2009 मध्ये झाला असून मंगेश पेरेने खोटी कागदपत्रे जोडून नोकरी मिळवल्याचं समोर आलं. 11 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या भावाच्या नावाचा आणि बनावट कागदपत्रांचा वापर करुन मंगेशने पालिकेत सुरक्षारक्षक म्हणून नोकरी केल्याचं उघडकीस आलं. या प्रकरणी पालिकेने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे.
नांदेडमध्ये नोकरीच्या आमिषाने गंडवणारी टोळी
दुसरीकडे, सरकारी नोकरी किंवा खासगी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी देतो, असं सांगून लाखो रुपयांना गंडवणाऱ्या एका टोळीचा पोलिसांनी काही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये पर्दाफाश केला होता. विशेष म्हणजे संबंधित टोळी ही तब्बल 9 राज्यांमध्ये कार्यरत होती. या टोळीने 9 राज्यांमध्ये आतापर्यंत शेकडो बेरोजगार तरुणांना नोकरीचं आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांनी लुबाडलं आहे.
या टोळीतील आरोपी ट्रेनिंगचाही बनाव करायचे. याशिवाय ते खोटं जॉयनिंग लेटर द्यायचे. अनेक तरुण ट्रेनिंगला लागल्यानंतर नोकरीला लावल्यानिमित्ताने लाखो रुपये या टोळीला द्यायचे. पण नंतर त्यांना आपण फसवलो गेलो, याची जाणीव व्हायची. अखेर पोलिसांनी या टोळीतील 7 आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी या सातही आरोपींना विविध राज्यांमधून अटक केली आहे.
विविध राज्यांमध्ये पसरलेले जाळे
हिंगोली जिल्ह्यातील वसमत पोलीस स्थानकात नोकरीचे आमिष दाखवून 10 लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती. हिंगोली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असता या रॅकेटची व्याप्ती देशातील अनेक राज्यात पसरली असल्याचे समोर आलं. ही टोळी नोकरीच्या शोधात असणाऱ्या बेरोजगार तरुणांना हेरायची. या तरुणांना रेल्वे, मुंबई महापालिका, एफसीआय, सीआयएसएफ अशा ठिकाणी नोकरीचे आमिष दाखवले जायचे. महाराष्ट्र, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, पश्चिम बंगाल यासह इतर राज्यातील अनेकांना या टोळीने आपल्या जाळ्यात ओढले होते
संबंधित बातम्या :
औरंगबादेत बनावट कागदपत्रांनी 12 जणांना नोकरी, मोठ्या रॅकेटचे धागेदोरे सापडणार?