Urmila Bhatt | पडद्यावर बड्या कलाकारांची आई; अभिनेत्री उर्मिला भट्ट यांची राहत्या घरी झालेली गळा चिरुन हत्या
22 फेब्रुवारी 1997 रोजी मुंबईतील जुहू परिसरातील घरी अभिनेत्री उर्मिला भट्ट मृतावस्थेत आढळल्या होत्या. चोरीच्या उद्देशाने उर्मिला यांची हत्या झाल्याचं पोलिस तपासात उघड झालं होतं.
मुंबई : अखियों के झरोको से, दिल अपना प्रीत परायी यासारख्या गाजलेल्या चित्रपटात झळकलेल्या प्रख्यात अभिनेत्री उर्मिला भट्ट (Urmila Bhatt) यांची मुंबईतील राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, ऋषी कपूर यासारख्या बड्या कलाकारांसोबत झळकलेल्या उर्मिला यांचा गळा चिरुन खून झाला होता. 22 फेब्रुवारी 1997 रोजी मुंबईतील जुहू परिसरातील घरी मृतावस्थेत आढळल्या होत्या. चोरीच्या उद्देशाने उर्मिला यांची हत्या झाल्याचं पोलिस तपासात उघड झालं होतं.
घरी एकट्या असताना हत्या
उर्मिला भट्ट यांचा मृत्यू झाल्याचे दुसऱ्या दिवशी सकाळी उघडकीस आले होते. उर्मिला यांचे जावई विक्रम पारिख घरी आले असता, कोणीच दरवाजा उघडला नाही. त्यामुळे विक्रम यांनी शेजाऱ्यांकडे विचारणा केली. तेव्हा बेल वाजवून कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने भट्ट यांची मोलकरीणही निघून गेल्याचं त्यांना समजलं. तेव्हा, विक्रम यांनी पत्नी रचनाला बोलावून घेतलं.
गळा चिरलेल्या अवस्थेत आढळल्या
रचना आणि विक्रम यांनी घराचा दरवाजा तोडून पाहिला असता त्यांना जबर धक्का बसला. अभिनेत्री उर्मिला भट्ट गळा चिरलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. घरातील सामानही चोरीला गेलं होतं. पती बडोद्याला गेल्यामुळे उर्मिला त्या दिवशी एकट्याच घरी होत्या. त्यामुळे ही संधी साधून चोरट्यांनी हल्ला केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला. मृत्यूसमयी त्या 62 वर्षांच्या होत्या.
गुजराती नाटकातून कारकीर्द सुरु
उर्मिला भट्ट यांचा जन्म देहरादूनचा. त्यांनी नाटकातून करिअरला सुरुवात केली. जवळपास 75 गुजराती चित्रपट आणि 15 ते 20 राजस्थानी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं. लोकनृत्य आणि लोकगायक म्हणून त्यांनी राजकोट संगीत कला अकादमीत प्रवेश केला होता.
बॉलिवूडमध्ये लोकप्रिय आई
बॉलिवूडमध्ये दोन दशकं त्यांनी गाजवली. या काळात त्यांनी 125 हून अधिक सिनेमे केले. गौरी (1968), संघर्ष (1968), हमराज (1967), अंखियां के झरोकों से (1978), गीत गाता चल (1975), बेशरम (1978), राम तेरी गंगा मैली (1985), बालिका बधू (1976), धुंद (1973) आणि अलिबाबा मरजिना (1977) अशा काही लोकप्रिय चित्रपटात त्या झळकल्या होत्या. बहुतांश भूमिका या सहाय्यक व्यक्तिरेखा होत्या.
अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जितेंद्र, शशी कपूर, ऋषी कपूर, शत्रुघ्न सिन्हा, प्रेम चोप्रा, रणजीत, डॅनी डेंगझोप्पा आणि हेमा मालिनी यासारख्या बड्या कलाकारांच्या आईची भूमिका साकारली होती. अखेरच्या काळात त्यांनी टीव्ही मालिकांमध्येही काम केलं. गुजरात सरकारकडूनही त्यांच्या कला क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात आला होता. मात्र एका गुणी अभिनेत्रीचा करुण अंत झाल्याने बॉलिवूडसह तमाम चाहते हळहळले होते.
संबंधित बातम्या :
अभिनेत्री प्रिया राजवंशची गळा दाबून झालेली हत्या, लिव्ह इन पार्टनर चेतन आनंदच्या मुलांवरच होता आरोप
‘देवमाणूस’ ज्यापासून प्रेरित, त्या डॉ. संतोष पोळने जिवंतपणी गाडले सहा जणांना