अनिल देशमुखांना आणखी किती काळ तुरुंगात ठेवणार ?, असं का म्हणाले फिर्यादीचे वकील
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अनिल देशमुख यांच्या जामिनावर सुनावणी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाला दिले होते.
मुंबई / ब्रिजभान जैस्वार (प्रतिनिधी) : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या जामीन अर्जावर अखेर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी (Hearing) झाली. यावेळी देशमुख यांच्यातर्फे जेष्ठ वकील विक्रम चौधरी यांनी युक्तिवाद केला. यावेळी कोर्टासमोर देशमुख यांना जामीन (Bail) देण्याची मागणी करण्यात आली. यासोबतच अखेर देशमुख यांना किती काळ तुरुंगात ठेवण्यात येणार आहे ? असा प्रश्नही करण्यात आला.
काय म्हणाले देशमुखांचे वकील ?
देशमुखांवर दाखल करण्यात आलेला गुन्हा हा केवळ संशयाच्या आधारावर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सीबीआयने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता आणि त्याच आधारावर ईडीने हा गुन्हा दाखल केला आहे. मात्र या प्रकरणात ईडीला कुठल्याही प्रकारचा आर्थिक ट्रांजेक्शन किंवा त्याचे पुरावे मिळाले नाहीत.
यामुळे अनिल देशमुख यांना आणखी किती काळ तुरुंगात ठेण्यात येणार आहे, असा प्रश्न अॅड. विक्रम चौधरी यांनी आज केला. या प्रकरणात आज अॅड. विक्रम चौधरी यांचा युक्तिवाद पूर्ण झाला. मात्र यावर उद्या एएसजी अनिल सिंग ईडीतर्फे युक्तिवाद करणार आहेत.
अॅड. विक्रम चौधरी आपल्या युक्तिवाद दरम्यान म्हणाले की, या प्रकरणांमध्ये अनिल देशमुख यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार समोर आलेले नाही.
जैन बांधवांचे अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुखांच्या शैक्षणिक ट्रस्टमध्ये ट्रांझेक्शनचा उल्लेख करत, त्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असं चौधरी म्हणाले. मात्र जर असा संबंध असता तर ईडीने जैन बंधूंना आणि चार्टर्ड अकाउंटंट या दोघांनाही या प्रकरणात आरोपी किंवा त्यांचा साक्षीदार म्हणून जवाब नोंदवला का नाही ? असा प्रश्न विक्रम चौधरी यांनी केला आहे.
सीबीआय आणि ईडी दोन्ही प्रकरण असल्याने सदर प्रकरणाचा ट्रायल सुरू व्हायला अद्याप बराच वेळा लागणार आहे. दोघांचाही खटला एकत्रित करणार असल्यामुळे फार काळ विलंब लागण्याची शक्यता आहे, असेही चौधरी यांनी आपल्या युक्तीवादात म्हटले आहे.
यामुळे देशमुख यांना इतका काळ तुरुंगात ठेवणे हे कायद्याने दिलेल्या अधिकाराचे उल्लंघन असेल. देशमुख यांना आरोग्याच्या अनेक समस्या आहेत. त्याचीही दखल न्यायालयाने घ्यावी, अशी विनंतीही अॅड. विक्रम चौधरी यांनी सुनावणी दरम्यान केली.
चौधरी यांनी सचिन वाझेंचाही मुद्दा केला उपस्थित
सचिन वाझे संदर्भात एक अत्यंत महत्वाच्या मुद्दा अॅड. विक्रम चौधरी यांनी मांडला. वाझे यांच्यावर अनेक गंभीर आरोप असल्याने त्यांच्या साक्षीला किती महत्व द्यायचं. एनआयएच्या कस्टडीमध्ये सचिन वाझे असताना त्यांनीच म्हटले होते की, त्यांच्यावर दबाव टाकून जबाब नोंदवण्यात येत आहे.
तसेच सचिन वाझे यांच्या जबाबामध्ये नंबर एक हे अनिल देशमुख असले तरी मात्र इतर लोकांच्या जबाबमध्ये नंबर एक हे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग असल्याचं म्हटलं गेलं आहे. म्हणून या प्रकरणात अनिल देशमुख यांना जामीन देण्यात यावा, अशी विनंती अॅड. विक्रम चौधरी यांनी आज मुंबई हायकोर्टासमोर सुनावणी दरम्यान केली.
सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेण्याचे दिले होते आदेश
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अनिल देशमुख यांच्या जामिनावर सुनावणी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाला दिले होते. या आदेशानुसार आज मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती एन जी जमादार यांच्या कोर्टासमोर सुनावणी झाली.