‘अगं ये म्हशे’ म्हणाला अन् जीवाला मुकला, हायकोर्टाकडून आरोपींना जन्मठेप; वाचा नेमके काय घडले ?
महिलेची छेडछाड केल्याच्या संशयातून शेतकऱ्याची हत्या करण्यात आली होती. खंडपीठाने दोन आरोपींची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. तथापि, दोन आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
मुंबई : पुण्यातील एका शेतात घडलेल्या हत्येच्या घटनेत मुंबई उच्च न्यायालया (Mumbai High Court)ने निकाल दिला आहे. न्यायालयाने दोघा आरोपींची जन्मठेप (Life Imprisonment) कायम ठेवली आहे, तर दोघा आरोपींना निर्दोष सोडले. शेतकऱ्याने त्याच्या म्हशीला ‘अगं ये म्हशे’ असा आवाज दिला होता. मात्र शेतकऱ्याने आपल्या पत्नीला टोमणा (Taunt) मारल्याचा संशय शेजाऱ्याला आला व त्याने संतापून शेतकऱ्याची हत्या केली होती.
पुणे सत्र न्यायालयाने चौघांना ठोठावली होती जन्मठेप
शेतकऱ्याच्या हत्या प्रकरणात याआधी पुणे सत्र न्यायालयाने चारही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्या अपिलावर द्विसदस्यीय खंडपीठासमोर नुकतीच सुनावणी झाली.
महिलेची छेडछाड केल्याच्या संशयातून शेतकऱ्याची हत्या करण्यात आली होती. खंडपीठाने दोन आरोपींची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. तथापि, दोन आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
दोन आरोपींविरोधातील आरोप ठोस पुराव्यांनिशी सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरला आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
नेमके काय आहे हे प्रकरण?
या प्रकरणातील वस्तुस्थिती मांडताना सरकारी पक्षाने सांगितले की, 24 ऑक्टोबर 2010 रोजी दुपारी 3.30 च्या सुमारास रेखा गायकवाड नावाच्या महिलेने शिवाजी गायकवाडविरोधात छेडछाड केल्याप्रकरणी अदखलपात्र तक्रार दाखल केली.
त्यादरम्यान रेखासह पार्वती गायकवाड आणि तान्हुबाई गायकवाड या तिघांनी शिवाजीला मारहाण केली. त्यामुळे शिवाजीने देखील त्यांच्याविरुद्ध नसरापूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र तक्रार दाखल केली होती.
त्यानंतर रेखाचा पती व इतर तिघांनी शिवाजीला त्याच्या घरी लाकूड आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. त्याच्या घरातून बाहेर पडत असताना दुसऱ्या व्यक्तीलाही मारहाण करण्यात आली.
त्यादिवशी आरोपीच्या घरातून रक्ताने माखलेले साहित्य जप्त केल्यानंतर चार जणांना अटक करण्यात आली. बेदम मारहाण केल्यामुळे शिवाजीची प्रकृती चिंताजनक होती. अखेर 31 ऑक्टोबर रोजी त्याचा मृत्यू झाला.
आरोपींनी धुडकावले होते सर्व आरोप
हत्येच्या घटनेचा तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग, भोर यांच्याकडे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. यावेळी आरोपींनी त्यांच्याविरोधातील सर्व आरोप नाकारले. त्यानंतर आरोपींना सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.
खटल्यादरम्यान फिर्यादीच्या काही साक्षीदारांनी साक्ष दिली की, आरोपी हे शेतकरी शिवाजी गायकवाडच्या शेतजमिनीत गेले होते. तेथे शिवाजी त्याच्या म्हशी चरत होता.
दुपारी 3.30 च्या सुमारास रेखा गायकवाड, तान्हुबाई गायकवाड आणि पार्वती गायकवाड या शेतातून जात असताना शिवाजीने आपल्या म्हशींना ‘ए म्हशे’ अशी हाक मारली.
परंतु तो टोमणा आपल्यालाच मारला असा समाज रेखाचा झाला आणि तिने व तिच्यासोबत असलेल्या दोन महिलांनी शिवाजीला मारहाण केली. नंतर रेखाच्या पतीने साथीदारांना सोबत घेऊन शिवाजीवर प्राणघातक हल्ला केला. त्या हल्ल्यातच शिवाजीचा मृत्यू झाला.
साक्षीदारांच्या जबाबात विसंगती
या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती ए. एस. गडकरी आणि न्यायमूर्ती एम. एन. जाधव यांच्या खंडपीठासमोर झाली. यावेळी खंडपीठाने साक्षीदारांच्या जबाबातील विसंगतीवर बोट ठेवले.
दोन साक्षीदारांच्या सबळ पुराव्याने चारही आरोपींच्या उपस्थितीचा संदर्भ दिला आहे, मात्र अन्य दोन साक्षीदारांच्या सबळ पुराव्यामध्ये अन्य दोन आरोपींच्या उपस्थितीचा संदर्भ नाही, असे खंडपीठ म्हणाले.
रेखा ही एका आरोपीची पत्नी होती. इतर आरोपींनी त्याला मदत केल्यामुळे शेतकरी शिवाजीवर हल्ला करण्याचा दोन आरोपींचा मजबूत हेतू असल्याचे सिद्ध होते, असेही न्यायालयाने नमूद केले आणि दोघा आरोपींच्या जन्मठेपेवर शिक्कामोर्तब केले. तसेच सबळ पुराव्याअभावी दोघांची निर्दोष सुटका केली.