अंबरनाथ : अंबरनाथमधील एका सीसीटीव्ही व्हिडीओनं पालिका कर्मचाऱ्याचा (Municipality Employee in Amabarnath) झोल उघडकीस आणला आहे. दोनशे रुपयांच्या पावतीआडून तब्बल बाराशे रुपयांचा दंड वसूल करणारा पालिकेचा कर्मचारी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. प्लॅस्टिक पिशव्यांविरोधात कारवाई करण्याची जबाबदारी या कर्मचाऱ्यावर देण्यात आली होती. मात्र कारवाई करताना सर्रास लूट केली जात असल्याचं धक्कादायक वास्तव सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून (CCTV Video) समोर आलं आहे. आता दोषी कर्मचाऱ्यावर काय कारवाई केली जाते, हे पाहणं महत्त्वाचं आहे. अंबरनाथ पश्चिमेच्या वांद्रापाडा परिसरात धर्मराज डेअरी नावाचं दुधाचं दुकान आहे. या दुकानात गुरुवारी 3 फेब्रुवारी रोजी सकाळी पालिकेचे काही कर्मचारी गेले. त्यांनी या दुकानात प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर होत असल्याचं सांगत दुकानदार मनीष पटेल (Manish Patel) याला तब्बल 1200 रुपये दंड भरण्यास सांगितलं. यावेळी दुकानदाराकडे पैसे नसल्यानं त्यानं अक्षरशः बाजूच्या दुकानदाराकडून उधार घेऊन पालिकेच्या कर्मचाऱ्यांना 1200 रुपये आणून दिले.
उधारी घेऊन दुकानदारानं दंड भरला खरा. मात्र पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्याला अवघ्या 200 रुपयांची पावती दिली. त्यामुळं मनीष याने पावती 200 रुपयांचीच का दिली? अशी विचारणा केली असता, जास्त बोललास तर 25 हजार रुपयांचा दंड लावेन, असा दम देत कर्मचारी तिथून निघून गेले. मात्र पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा हा झोल सीसीटीव्हीत कैद झाला. या घटनेप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी दुकानदार मनीष पटेल याने केली आहे.
बघा.. अंबरनाथमध्ये पालिकेचे कर्मचारीच दुकानदारांना लुटतायत… पावती देतात दोनशेची आणि पैसे घेतात बाराशे..
व्हिडीओ – निनाद करमरकर, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, अंबरनाथ pic.twitter.com/23qJtBXMbk
— Siddhesh Sawant (@ssidsawant) February 4, 2022
दरम्यान, हे प्रकरण घडल्यानंतर अंबरनाथ पालिकेच्या अधिकाऱ्यांनाही याची माहिती मिळाली. त्यानुसार आता या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अंबरनाथ नगरपालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख सुरेश पाटील यांनी दिली आहे. आता दुकानदारांना कारवाईच्या आडून लुटणाऱ्या कर्मचाऱ्यावंर नेमकी काय कारवाई केली जाते, हे पाहणं महत्त्वाचंय.
ज्या कर्मचाऱ्याने डेअरी मालक मनीष पटेल याच्याकडून हे जास्तीचे पैसे घेतले, त्याच कर्मचाऱ्याच्या विरोधात व्यापाऱ्यांनी यापूर्वीही अनेकदा तक्रारी केल्या आहेत. बाजारपेठेत एकाच दुकानात जाऊन दररोज दंडवसुली करणे आणि सरतेशेवटी महिन्याचा हफ्ता मागणे, व्यापाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देणे असे आरोप या कर्मचाऱ्यावर अनेक व्यापाऱ्यांनी यापूर्वीही अनेकदा केले आहेत. त्यामुळं आता तरी पालिका या कर्मचाऱ्यावर कारवाई करते का? याकडे व्यापाऱ्यांचं लक्ष लागलंय.
CCTV | रात्री गाडी अडवल्याचा राग, शिवसेना पदाधिकाऱ्याची सकाळी तरुणाला रॉडने मारहाण
अंबरनाथमध्ये डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या, तर्कवितर्कांना उधाण, पोलिसांकडून चौकशीला सुरुवात