मुंबईतही महिला सुरक्षित नाही, सीएसएमटी परिसरातील टॅक्सी स्टँडच्या मागे महिलेवर बलात्कार
सीएसएमटी परिसरात असलेल्या टॅक्सी स्टँडच्या मागे दोन जणांनी एका महिलेवर बलात्कार केला. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता मुंबईतील सीएसएमटी परिसरात एका महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सीएसएमटी परिसरात असलेल्या टॅक्सी स्टँडच्या मागे दोन जणांनी एका महिलेवर बलात्कार केला. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल परिसरात एका 29 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना 22 सप्टेंबरला घडली. पीडित महिला सीएसएमटी स्थानकाबाहेर रात्री एकटीच होती. त्यावेळी दोन अज्ञात व्यक्ती तिथे आल्या. यातील एकाने ती महिला आरडाओरड करेल म्हणून तिचे तोंड बंद केले. यानंतर त्यांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेरील टॅक्सी स्टॅडच्या पाठीमागे तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले. यावेळी त्या महिलेला धमकीही देण्यात आली.
याप्रकरणी त्या महिलेने सीएसएमटी लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीत तिने घडलेला संपूर्ण प्रसंग सांगितला. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता याप्रकरणी पुढील तपासासाठी मुंबई पोलिसांच्या माता रमाबाई मार्ग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. सध्या पोलीस या घटनेतील आरोपींचा शोध घेत आहेत.
बदलापूर, पुण्यातही बलात्काराच्या घटना
गेल्या महिन्यात बदलापुरात दोन चिमुकल्या मुलींवर शाळेत अत्याचार करण्यात आले. त्यानंतर आता पुण्यातही अशाचप्रकारे धक्कादायक घटना उघडकीस आली. पुण्यात स्कूल बसमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर ड्रायव्हरकडून अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आज पुण्यात मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका तरूणीवर तिघांनी सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
महिलांसाठी मुंबईही असुरक्षित
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सातत्याने अत्याचाराच्या घटना घडत आहेत. त्यातच आता मुंबईतील उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीएसएमटी परिसरात अशाप्रकारे महिला अत्याचाराची घटना घडल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. यानंतर आता महिलांसाठी मुंबईही असुरक्षित असल्याची भावना व्यक्त होऊ लागली आहे. तसेच या घटनांवर लवकरात लवकरच कडक कायदा बनवावा आणि आरोपींना शिक्षा द्यायला हवी, अशीही मागणी होत आहे.