Cyrus Mistry Accident : 9 मिनिटांत 20 किमीचं अंतर कापलं! सीटबेल्टही लावला नव्हता, मृत्यूआधी सायरस मिस्त्री यांच्यासोबत नेमकं काय घडलं?
या अपघातानंतर पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजही पाहणी करण्यात आली. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये 2.21 मिनिटांनी ही कार चेकनाक्यावरुन पुढे गेल्याचं दिसलंय. त्यानंतर मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झालेली कार 20 किलोमीटर पुढे जाऊन डिव्हायडरला धडकली होती.
मुंबई : पालघर (Palghar Accident) जिल्ह्यामध्ये कार अपघातात सायरस मिस्त्री यांचा मृत्यू (Cyrus Mistry Accident News) झाला. या अपघाताने सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकवला. सुरुवातीच्या तपासात हा अपघात अतिवेगामुळे झाल्याचं दिसून आलंय. या अपघाताआधी सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांच्या कारने अवघ्या 9 मिनिटांत तब्बल 20 किलोमीटर इतकं अंतर कापलं होतं. याचाच अर्थ जवळपास ताशी 130 किलोमीटर पेक्षाही जास्त वेगाने मर्सिडीज कार चालली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या तपासात दोन महत्त्वाच्या गोष्टींची नोंद करण्यात आली आहे. यातील पहिली गोष्ट म्हणजे सुसाट वेगामुळे हा अपघात घडला असावा. तर दुसरी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे सायरस मिस्त्री हे गाडीच्या मागच्या सीटवर बसले होते. शिवाय त्यांनी सीटबेल्टही लावलेला नव्हता, असं पोलिसांच्या तपासातून समोर आलंय.
टाटा समुहाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री हे गुजरातहून मुंबईच्या दिशेने येत होते. पण वाटेतच काळानं त्यांच्यावर घाला घातला. ते ज्या मर्सिडीज कारने येत होते, ती कार पालघर जिल्ह्यात अपघातग्रस्त झाली. सूर्या नदीवरील पुलाच्या डिव्हायडरला कार धडकली. ही धडक इतकी भीषण होती की कारमध्ये मागच्या बाजूला बसलेले सायरस मिस्त्री आणि त्यांच्यासोबतच मागे बसलेला आणखी एक प्रवासी यांचा जागच्या जागीच मृत्यू झाला. सायरस मिस्त्री यांच्या सहप्रवाशानेही सीट बेल्ट लावलेला नव्हता.
Video : पोलिसांनी अपघाताबद्दल काय म्हटलं?
सुसाट वेगाचा बळी!
सायरस मिस्त्री यांच्या कारचा अपघात अतिवेगाने झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यांची कार ही 20 किलोमीटर अंतर अवघ्या 9 मिनिटांत पार करुन गेली होती. पालघर जिल्ह्याच्या चरोटी चेक नाक्यावरुन पुढे गेल्यानंतर या गाडीने जबरदस्त वेग पकडला होता. हा चेक नाका पार केल्यानंतर अवघ्या 9 मिनिटांत कारने 20 किलोमीटर अंतर कापलं होतं. ड्रायव्हरच्या चुकीमुळे हा अपघात घडल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. पोलीस या अनुशंगाने पुढील तपास करत आहेत.
सायरस मिस्त्री यांचं ज्या मर्सिडीज कारच्या अपघातात निधन झालं, ती मर्सिडीज कार एक महिला चालवत होता. प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ अनाहिता पंडोले नावाची स्त्री ड्रायव्हिंग करत होती. डॉक्टर अनाहिता पंडोले यांचं वय 55 वर्ष असून या भीषण अपघातात त्या गंभीर जखमी झाल्यात. तर त्यांच्या शेजारी बसलेले त्यांचे पती डेरिअस पंडोले (60) हे देखील जखमी झालेत. तर जहांगीर पंडोले आणि सायरस मिस्त्री हे कारच्या मागच्या सीटवर बसले होते. दोघांनीही सीट बेल्ट लावलेला नव्हता. भरधाव मर्सिडीज जेव्हा डिव्हाडरला धडकली त्यावेळी त्या दोघांनाही जबर मार बसला. यातच त्यांचा जागच्या जागी जीव गेला. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
Video : अपघातानंतर कारचा चक्काचूर
सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय?
या अपघातानंतर पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजचीही पाहणी करण्यात आली. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये 2.21 मिनिटांनी ही कार चेकनाक्यावरुन पुढे गेल्याचं दिसलंय. त्यानंतर मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झालेली कार 20 किलोमीटर पुढे जाऊन डिव्हायडरला धडकली होती. या अपघातप्रकरणी पालघर पोलीस पुढील तपास करत आहेत. सुसाट वेगासोबत इतर कोणत्या कारणांमुळे नेमका हा अपघात झाला, याचा आता कसून शोध घेतला जातोय.