मुंबई | 8 फेब्रुवारी 2024 : दहीसरमधील गोळीबाराचं प्रकरण आता वेगळ्या वळणावर पोहोचलं आहे. दहीसरमधील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. हा गोळीबार नेमका कुणी केला, का केला? याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया देताना मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता या प्रकरणाला नवं वळण देणारी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या मॉरिस भाईने स्वत:वरही गोळ्या झाडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या मॉरिस भाईने आधी अभिषेक यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर स्वत: वर 4 गोळ्या झाडल्याची माहिती समोर येत आहे. पैशांच्या वादातून सर्व प्रकार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. हळदी कुंकूचा कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी गोळीबार करण्यात आला आहे.
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी मोठा दावा केला आहे. मॉरेशियस नावाच्या व्यक्तीने केल्याचा दावा बाळकृष्ण ब्रीद यांनी केला आहे. “कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे. आमच्यासाठी आजचा दिवस अत्यंत वेदनादायी आहे. आमच्या सहकाऱ्यावर गोळीबार केला आहे. विशेष म्हणजे आरोपीने आपल्या कार्यालयामध्ये कार्यक्रम असल्याचं बोलावून गोळीबार केला आहे, अशी आम्हाला माहिती मिळत आहे”, असं बाळकृष्ण ब्रीद म्हणाले.
“दहीसर कार्यक्रमात मी होतो तिथे कार्यकर्ते धावून आले आणि गोळीबार झाला असल्याची माहिती दिली. मॉरेशियस नावाचा व्यक्ती कुणीतरी व्यक्ती आहे, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आहे, अशी माहिती आम्हाला कळलेली आहे. अभिषेक यांना एक ते दोन गोळ्या लागल्या आहेत असं प्रथमदर्शी डॉक्टरांकडून कळलं आहे. उपचार चालू आहेत. पण प्रकृती चिंताजनक आहे. एक ते दोन लोकं होते. स्वत: मोरेशियस नावाच्या व्यक्तीने गोळीबार केला आहे. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे का? याबाबत माहिती मिळालेली नाही. आपापसात वाद होता, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे”, अशी प्रतिक्रिया बाळकृष्ण ब्रीद यांनी दिली आहे.