एक लग्न झालेलं असूनही दुसरं लग्न केलं आणि मुलगी झाली, तर संपत्तीत तिला किती वाटा? कोर्टानं सांगितलं!
दुसऱ्या लग्नापासून झालेल्या मुलीबाबत मुंबई हायकोर्टाने दिला मोठा निर्णय! काय म्हणालं कोर्ट?
मुंबई : एक लग्न झालेलं असूनही जर दुसरं लग्न केलं आणि दुसऱ्या लग्नापासून मूल झालं, तर त्यालाही संपत्तीत (Property issue) वाटा मिळणार का? वारस म्हणून दुसरं लग्नही वैध (Second Marriage) राहणार का, याबाबत मुंबई हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिलाय. एक याचिका निकाली काढताना मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं. एक लग्न झालेलं असताना आणि पहिली बायको जिवंत असतान केलेलं दुसरं लग्न वैध ठरणार नाही, असं कायदा सांगतो. पण दुसऱ्या लग्नापासून झालेलं अपत्यालाही वडिलांच्या संपत्तीत वारसदार म्हणून हक्क मिळायला हवं, असं कोर्टाने म्हटलंय.
एअर इंडिया इंजिनिअरींग सर्विस लिमिटेडमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या संपत्तीची वाटणी करताना पहिल्या पत्नीने दुसऱ्या पत्नीच्या अपत्यांना त्यात वाटा मिळू नये, यासाठी दाद कोर्टात दाद मागितली होती.
यावर दुसऱ्या पत्नीच्या मुलीनेही कोर्टात आपलं म्हणणं मांडलं. आपल्याला वडिलांच्या संपत्तीत वारसाहक्काने अधिकार मिळावा, असं म्हटलं होतं. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त दिलंय.
दरम्यान, 1955 च्या हिंदू विवाह कायद्यानुसार, दुसरं लग्न अवैध ठरवलं जातं. असं असलं तरी दुसऱ्या लग्नापासून झालेल्या अपत्याला वडिलांच्या वारसा हक्कावर अधिकार मिळायला हवं, असं कोर्टानं स्पष्ट केलंय.
कोर्टाने मृत व्यक्तीच्या संपत्तीचे समान भाग करुन त्याचा एक हिस्सा हा दुसऱ्या लग्नापासून झालेल्या मुलीला देण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार एअर इंडिया इंजिनिअरींग सर्विस लिमिटेडला निर्देशही जारी करण्यात आले आहेत. येत्या चार महिन्यांत याबाबतची प्रक्रिया पूर्ण करावी, असं कोर्टाने म्हटलंय.
मृत व्यक्तीच्या दुसऱ्या लग्नापासून झालेल्या मुलीला त्याच्या संपत्तीचा एक चतुर्थांश हिस्सा देण्यात यावा, असं कोर्टाने यावेळी म्हटलंय. त्यानुसार संपत्तीची विभागणी केली जावी, असंही म्हटलंय. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना एअर इंडिया इंजिनिअरींग सर्विस लिमिटेडकडून जी भरपाई मिळणार आहे, ती देताना त्यानुसार विभागणी केली जावी, असं कोर्टाने स्पष्ट केलंय.