खंडणी प्रकरणी दाऊदच्या हस्तकांची पोलीस कोठडीत रवानगी, आरोपींकडून नवा खुलासा होण्याची शक्यता
आज पोलीस कोठडी संपल्याने सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. आज पुन्हा या प्रकरणात आणखी काही तपास बाकी असल्याने या आरोपींना पुन्हा कोठडी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) नावाने खंडणी वसुल करणाऱ्या सहा आरोपींना 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने ही कोठडी सुनावली आहे. तर या प्रकरणातील आणखी एक आरोपी सलीम फ्रुटची न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody for Salim Fruit) रवानगी करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडून 11 ऑक्टोबर रोजी या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली होती.
खंडणी प्रकरणात अधिक तपासासाठी पोलीस कोठडी
या आरोपींना 18 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. आज पोलीस कोठडी संपल्याने सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. आज पुन्हा या प्रकरणात आणखी काही तपास बाकी असल्याने या आरोपींना पुन्हा कोठडी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.
मुंबई पोलिसांकडून पोलीस कोठडीसाठी न्यायालयात युक्तीवाद
मुंबई पोलिसांच्या वतीने न्यायालयात आरोपींच्या पोलीस कोठडीसाठी युक्तिवाद करण्यात आला. सहा आरोपींच्या घरी केलेल्या छापेमारीत अनेक कागदपत्र सापडले आहेत. या कागदपत्रांची आणि या सर्व आरोपींच्या बँक व्यवहाराची अधिक माहिती मिळवणे बाकी आहे.
सहा आरोपींना पोलीस कोठडी
तसेच या माहितीवर आणखी तपास करणे देखील अद्याप बाकी असल्याने आरोपींना आणखी आठ दिवसाची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने 21 ऑक्टोबरपर्यंत सहा आरोपींची पोलीस कोठडीत पुन्हा रवानगी केली आहे.
सलीम फ्रुटला न्यायालयीन कोठडी
रियाज भाटी, समीर खान, अजय गोसालीया, फिरोज चमडा, अमजद रेडकर आणी जावेद खान या सहा आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली आहे तर सलीम फ्रुट न्यायालयीन कोठडी देण्यात आली. अटक आरोपी अमजद रेडकरचे वकील अॅड विकी शर्मा यांनी ही माहिती दिली.