मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) गेल्या दोन वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहेत. नुकतेच धनंजय मुंडे प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात होते. त्यानंतर राज ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे ते चर्चेत आले. त्याआधी एका घरगुती लग्नाच्या वरातीत मनमुराद नाचताना दिसले. त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला. बीडमध्ये (Beed Dhananjay Munde) झाडावर चढून आंदोलन करणाऱ्या महिलेची मनधरणी करण्यासाठी थेट मंत्री मुंडे पोहोचले होते. वारंवर या ना त्या कारणामुळे धनंजय मुंडे सतत चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. एका महिलेनं त्यांच्याकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली. या महिलेचं नाव रेणू शर्मा. रेणू शर्माला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मुंबई पोलिस तिची चौकशी करत आहेत. या महिलेनं इंटरनॅशनल कॉल करुन खंडणी मागितल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता. ही महिला नेमकी कोण? (Who is Renu Sharma) हे जाणून घेऊयात…
दरम्यान, आता ब्लॅकमेल करणाऱ्या रेणू शर्माला पोलिसांनी अटक केली आहे. क्राईम ब्रांचकडून तिची चौकशी केली जातेय. या संपूर्ण चौकशीतून आता नेमकी काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचंय. दरम्यान, या महिलेला अटक करण्यात आल्यानंतर धनंजय मुंडे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सहनशक्ती संपल्यानंतर मला पोलिसात तक्रार द्यावी लागली, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. आता पुढे जे काही करायचं ते पोलीसच करतील, असंही त्यांनी म्हटलंय.
धनंजय मुंडे यांनी मलबार पोलिस स्थानकात या महिलेविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण मलबार पोलिसांनी क्राईम ब्रांचकडे वर्ग केलं होतं. त्यानंतर या महिलेवर अटकेची कारवाई करण्यात आली. आता या महिलेच्या चौकशीतून अनेक ब्लॅकमेलिंगच्या प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.