आयसीयुत रुग्णांची मृत्यूची झुंज, डॉक्टर बर्थ डे पार्टीत मश्गुल; ‘या’ पालिका रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
व्ही. एन. देसाई रुग्णालयात 260 पेक्षा जास्त बेड आहेत. या रुग्णालयात आउटसोर्सिंग एजन्सीद्वारे चोवीस तास दोन डॉक्टर्स असणे आवश्यक आहे.
मुंबई : सांताक्रूझ येथील पालिकेच्या व्ही. एन. देसाई (V.N.Desai) या रुग्णालयातील कंत्राटी डॉक्टरचा अक्षम्य निष्काळजीपणा उघडकीस आला आहे. आयसीयूतील रुग्णांना भगवानभरोसे सोडून डॉक्टर (Doctor) चक्क वाढदिवसाच्या पार्टी (Party)ला गेला. डॉक्टरने रुग्णांना मृत्यूच्या दाढेत लोटून केलेल्या बर्थ डे सेलिब्रेशनवर रुग्णाच्या नातेवाईकांनी तीव्र आक्षेप घेतला असून डॉक्टरची चौकशी करण्याची मागणी होत आहे. 16 सप्टेंबरच्या रात्री हा धक्कादायक प्रकार घडला. त्यावेळी आयसीयूमध्ये एकूण सात रुग्ण मृत्यूशी झुंज देत उपचार घेत होते.
डायरीत डॉक्टर हरवल्याची नोंद
कंत्राटी डॉक्टरने आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी रुग्णालयातून पार्टीचे ठिकाण गाठले. या प्रकाराने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही मोठा धक्का बसला. परिचारिका इतक्या हताश झाल्या होत्या की, त्यांच्या प्रभारींनी 17 सप्टेंबरला पहाटे 3.40 वाजता त्यांच्या डायरीत डॉक्टर हरवल्याची नोंदही लिहिली.
पालिकेच्या व्ही. एन. रुग्णालयातील धक्कादायक वैद्यकीय निष्काळजीपणाची ही पहिलीच घटना नसल्याचे बोलले जात आहे. याआधी अनेकदा डॉक्टरांचा निष्काळजीपणा उजेडात आला आहे.
24 तास दोन डॉक्टर असणे आवश्यक
व्ही. एन. देसाई रुग्णालयात 260 पेक्षा जास्त बेड आहेत. या रुग्णालयात आउटसोर्सिंग एजन्सीद्वारे चोवीस तास दोन डॉक्टर्स असणे आवश्यक आहे. मात्र हा नियम अनेकदा धाब्यावर बसवला जातो. कंत्राटी डॉक्टरांच्या बेफिकिरीवर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी नाराजीचा सूर आळवला आहे.
डॉक्टरांना कोणतीही शिस्त नाही. ते त्यांच्या मर्जीने येतात आणि जातात. अनेकदा डॉक्टर ड्युटीची वेळ संपण्याआधीच निघून जातात. पुढच्या शिफ्टमधील डॉक्टर उशिराने येतात. त्या कालावधीत हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच नसतात, असे एका कर्मचाऱ्याने सांगितले.
पालिकेशी संलग्न रुग्णालयांचे व्यवस्थापन आउटसोर्स डॉक्टरांद्वारे
मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांसह रुग्णालयांमध्ये रुग्णांची काळजी घेण्यासाठी स्वत:चे डॉक्टर असतात, तर पालिकेशी संलग्न (परिधीय) रुग्णालयांचे व्यवस्थापन आउटसोर्स डॉक्टरांद्वारे सांभाळले जातात.
व्ही. एन. देसाई रुग्णालयात जीवन ज्योत चॅरिटेबल ट्रस्टद्वारे एमडी आणि एमबीबीएस डॉक्टरांची शिफ्ट लावली जाते. यासाठी मुंबई महापालिका प्रशासन दर 125 दिवसांनी ट्रस्टला सुमारे 42 लाख रुपये देते.
पालिकेच्या रुग्णालयात सर्वसामान्य रुग्ण दूरवरून उपचार घेण्यासाठी येतात. सर्वसामान्य रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्यास रुग्णालयांकडून हेळसांड केली जाते. यावर पालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
तर आयसीयूतील रुग्णांना वाऱ्यावर सोडून बर्थ डे पार्टीसाठी जाणाऱ्या डॉक्टरची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रुग्णाच्या नातेवाइकांकडून तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.